‘ईबे इंडिया’ संकेतस्थळ होणार बंद; फ्लिपकार्टसोबतची भागीदारी संपुष्टात

0
ईबे इंडिया संकेतस्थळ, ebay india

‘ईबे इंडिया’ हे संकेतस्थळ आता बंद होणार असून याच्या जागी फ्लिपकार्ट कंपनी लवकरच याच प्रकारचे स्वतंत्र पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी फ्लिपकार्ट आणि ईबे इंडिया या दोन्ही शॉपींग पोर्टलने हातमिळवणी केली होती. यानुसार ‘ईबे’वर रिफर्बीश्ड अर्थात वापरलेल्या/दुरूस्त केलेल्या उत्पादनांची विक्री सुरू करण्यात आली होती. यासाठी दोन्ही कंपन्यांनी १.४ अब्ज डॉलर्स (सुमारे ९०३० करोड रूपये) इतक्या निधीची उभारणीदेखील केली होती. यात ईबे ग्लोबल, टॅनसेंट आणि मायक्रोसॉफ्ट आदी कंपन्यांची हिस्सेदारी होती. यातूनच ‘ईबे इंडिया’ हे संकेतस्थळ फ्लिपकार्टने अधिग्रहीत केले होते. गत सुमारे एक वर्षापासून या दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे कार्यरत होत्या. तथापि, आता ‘इबे इंडिया’ हे पोर्टल बंद होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी ‘ईबे’च्या कर्मचार्‍यांना एका ई-मेलच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. यानुसार १४ ऑगस्टपासून हे संकेतस्थळ बंद करण्यात येणार आहे. तर यावरील विविध प्रॉडक्टची लिस्टींग ही फक्त ३१ जुलैपर्यंतच कायम राहणार आहे.

दरम्यान, १४ ऑगस्टनंतर फ्लिपकार्टवर रिफर्बीश्ड उत्पादनांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. तर ‘ईबे इंडिया’ हे पोर्टलदेखील यानंतर स्वतंत्रपणे कार्यरत होणार आहे. मात्र याचे स्वरूप नेमके कसे असणार याबाबत कोणतेही सूतोवाच या ई-मेलमध्ये करण्यात आलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हे पोर्टल पुन्हा नव्या स्वरूपात भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here