‘ई-कॉमर्स’मध्ये अमेरिकेचे अंधानुकरण नको-जॅक मा

0

‘ई-कॉमर्स’मध्ये भारतीय कंपन्यांनी अमेरिकन प्रणालीचे अंधानुकरण करू नये असे आवाहन अलीबाबा कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी केले आहे.

चीनमधील अलिबाबा कंपनीचा संस्थापक जॅक मा हा एक द्रष्टा आणि हिकमती माणूस. पुर्वायुष्यात जेमतेम परिस्थितीतल्या इंग्रजीचा शिक्षक असणार्‍या जॅकने नोकरी सोडून अवघ्या नऊ सहकार्यांसह सुरू केलेल्या कंपनीने अक्षरश: स्वप्नवत झेप घेतली असून या कंपनीचे आजचे मुल्य बारा लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. आजवर फक्त चीनमध्ये कारभार करणार्या जॅकचे लक्ष आता विशालकाय भारतीय बाजारपेठेवर आहे. यामुळे अवघ्या चार महिन्यात त्यांनी दुसर्यांदा भारताला भेट दिली. कालच ते पंतप्रधानांना भेटले. अलीबाबा समुहाने चीनमध्ये व्यापाराची व्याख्याच बदलून टाकली आहे. म्हणजे स्वत:च्या पेमेंट गेटवेसह ऑनलाईन पोर्टल्स, मॉल्स, वेअरहाऊसेस, चेन शॉपीज, ऍफिलीयेट सर्व्हीसेस आदींच्या माध्यमातून लक्षावधी खरेदी-विक्री करणार्‍यांचे एकजीनसी जाळे त्यांनी उभारले आहे. याच्यासोबत आयटीतल्या अन्य शाखांकडेही त्यांचे लक्ष आहेच.

जॅक मा यांच्या भारतभेटीत त्यांनी मांडलेला महत्वाचा मुद्दा असा- भारतातील ई-कॉमर्स हे बहुतांश ‘बी-टू-सी’ अर्थात ‘बिझनेस टू कस्टमर’ या प्रणालीवर आधारित आहे. अर्थात मला हव्या असणार्‍या वस्तूची मी संबंधीत कंपनीला ऑर्डर देतो आणि ती वस्तू माझ्याकडे येते. अमेझॉनसारख्या अमेरिकन कंपन्यांनी हे मॉड्युल तयार केले असून फ्लिपकार्टसह अन्य भारतीय कंपन्या याचे अंधानुकरण करत असल्याचा थेट आरोप जॅक मा यांनी केला. यात नफा फक्त एका केंद्रीय कंपनीला मिळतो. मात्र ‘बी-टू-बी’ अर्थात बिझनेस टू बिझनेस’ ही प्रणाली अधिक वास्तववादी आणि यशस्वी ठरणारी असल्याचे त्यांचे मत आहे. म्हणजे-कुणालाही स्थानिक ग्राहकांना विकण्यासाठी टायर्स हवे आहेत. मग तो व्यापारी अलीबाबाच्या सेवेच्या माध्यमातून चीन वा जगातील कोणत्याही ठिकाणच्या उत्पादकाशी थेट संपर्क साधून मला हव्या असणार्‍या कंपनीचे टायर्स विकत घेऊ शकतो. यात मध्यस्थ म्हणून अलीबाबा वा अन्य कोणतीही कंपनी राहू शकते. या मॉड्युलमध्ये संबंधीत कंपनी, स्थानिक व्यापारी आणि अर्थातच अलीबाबा या तिघांना लाभ होईल.
नेमका हाच मुद्दा अधोरेखित करत ही प्रणाली किरकोळ भारतीय व्यापार्‍यांना लाभदायक ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. भारतीय कंपन्यांनी किमान ई-कॉमर्समध्ये तरी अमेरिकीकरण (‘बी-टू-सी’) नव्हे तर जागतिकीकरणाला (‘बी-टू-बी’) प्राधान्य द्यावे असे मतही जॅक मा यांनी व्यक्त केले आहे. आता त्यांचा सल्ला कोण कितपत ऐकणार यात शंका असली तरी खुद्द अलीबाबा भारतीय बाजारपेठेत (केंद्र शासनाच्या धोरणावर ते बहुतांश अवलंबून आहे. सध्या ‘बी-टू-बी’मध्येच थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. ) जेव्हा पुर्ण ताकदीनिशी उतरले तेव्हा मात्र भारतीय ‘ई-कॉमर्स’ची दिशादेखील बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
jack_ma_modi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here