कायनेटीक ग्रीनची ई-ऑटो

0

कायनेटीक ग्रीन कंपनीने देशात प्रथमच लिथियम आयन या प्रकारच्या बॅटरीवर चालणारी कायनेटीक सफर ही तीनचाकी ई-ऑटो सादर केली आहे.

इंधनांचे वाढते दर आणि अर्थातच भयंकर प्रदूषणामुळे इलेक्ट्रीक चार्जिंगवर चालणार्‍या वाहनांना हळूहळू का होईना लोकप्रियता मिळू लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर कायनेटीक ग्रीन कंपनीने सफर ही आपली ई-ऑटो बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. खरं तर देशात अनेक ई-ऑटो उत्पादक आहेत. मात्र कायनेटीक ग्रीन कंपनीने प्रथमच लिथीयम आयन या प्रकारच्या बॅटरीवर चालणारी ऑटो विकसित केली आहे. बहुतांश ई-ऑटो या लीड अ‍ॅसिड या प्रकारच्या बॅटरीवर चालणार्‍या आहेत. यात अनेक त्रुटी आहेत. एक तर त्या थोड्या वजनी असून याला चार्ज करण्यासाठी जवळपास १० तासांचा कालावधी लागतो. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या लवकर डिस्चार्जही होतात. या पार्श्‍वभूमिवर लिथीयम आयन बॅटरी ही ५०-६० हजारांनी महाग असली तरी ती दीर्घ काळ टिकते अन् तिला चार्ज होण्यासाठी कमी वेळ लागतो. एकदा चार्ज केल्यानंतर हे मॉडेल सुमारे ८० ते १०० किलोमीटर धावू शकते असा कंपनीचा दावा आहे. याचा अधिकतम वेग २५ किलोमीटर प्रति-तास इतका असेल. याची वाहक क्षमता ड्रायव्हरसह चार प्रवाशांची आहे. विशेष म्हणजे ही भारतातील पहिलीच दणकट स्टील बॉडी असणारी ई-ऑटो असल्याचा कंपनीचा दावा आहे. या ई-ऑटोच्या विविध व्हेरियंटचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आले नसून सुमारे महिनाभरात याला जाहीर करण्यात येणार असल्याचे कायनेटीक ग्रीन कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here