गुगलच्या अँड्रॉइड पी आवृत्तीचे नामकरण जाहीर

0
गुगल अँड्रॉइड पी, google android p

गुगलने आपल्या अँड्रॉइड प्रणालीच्या पी आवृत्तीचे नामकरण करून या ऑपरेटींग सिस्टीमला आज अधिकृतपणे लाँच करण्यात आले आहे.

अँड्रॉइड ९ या आवृत्तीची घोषणा आधीच करण्यात आली असून याचे फिचर्सदेखील जाहीर करण्यात आलेले आहेत. याला प्रयोगात्मक अवस्थेत डेव्हलपर्ससाठी उपलब्धदेखील करण्यात आले होते. तथापि, याची फायनल आवृत्ती आणि अर्थातच नाव केव्हा जाहीर होणार याबाबत कुतुहलाचे वातावरण निर्मित झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज गुगलने अधिकृतपणे अँड्रॉइड ९ प्रणालीची घोषणा केली आहे. आजपासून गुगलच्या पिक्सेल या मालिकेतील स्मार्टफोन्सला याचे अपडेट प्रदान करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यासोबत या आवृत्तीला एक अतिशय गोड नावदेखील मिळाले आहे.

गुगलने आपल्या अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना मिष्ट पदार्थांचे नाव दिले आहे. नवीन आवृत्तीसाठी जगातल्या एखाद्या देशामध्ये लोकप्रिय असणारे चॉकलेट, आईसक्रीम, डेझर्ट, बिस्कीट अथवा अन्य मिठाईचे नाव दिले जाते. यात कपकेक, डोनट, एक्लेयर, फ्रोयो. जिंजरबर्ड, हनीकोंब, आईसक्रीम सँडवीच, जेलीबीन, किटकॅट, लॉलीपॉप, मार्शमॅलो, नोगट आणि ओरिया यांचा समावेश आहे. सध्या अँड्रॉइडची आठवी आवृत्ती प्रचलीत असून याला ओरियो हे नाव देण्यात आले आहे. या वर्षीच्या मे महिन्यात झालेल्या गुगल आय/ओ परिषदेत अँड्रॉइडची नववी अर्थात पी या आवृत्तीची घोषणा करण्यात आली होती. यामुळे या आवृत्तीला नेमके काय नाव मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. यासाठीचे नाव हे गुगलने सुरू केलेल्या परंपरेनुसार मिष्ट पदार्थाचेच असणार ही बाब स्पष्ट आहे. मात्र यासाठी कोणते नाव निवडण्यात येणार याबाबत उत्सुकता लागली होती. मध्यंतरी ब्लुमबर्ग या वृत्तसंस्थेने मपीफ आवृत्तीचे नाव पिस्ताचिओ आईसक्रीम असेल असा गौप्यस्फोट केला होता. तर चीनी सोशल मीडियातदेखील याच नावाची चर्चा सुरू होती. तथापि, गुगलने अँड्रॉइडच्या पी आवृत्तीला पाई हे नाव देण्यात आले आहे. अर्थात ही नवीन आवृत्ती आता अँड्रॉइड ९ पाई या नावाने ओळखली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुगलच्या पिक्सेल मालिकेतील स्मार्टफोनमध्ये या आवृत्तीचे अपडेट सर्वात पहिल्यांदा मिळणार आहे. यानंतर अन्य फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील मॉडेल्समध्ये याचा वापर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here