ट्रकही बनतेय स्मार्ट !

0

गुगलसह अनेक कंपन्यांनी वाहकाविना चालणार्‍या कारची निर्मिती केली आहे. आता मर्सडिज-बेंझ या विख्यात कंपनीने ड्रायव्हरविना धावणार्‍या स्मार्ट ट्रकच्या निर्मितीत यश मिळवले आहे.

Shaping Future Transportation

रस्त्यांवरील बहुतांश अपघात हे मानवी चुकीमुळे होत असल्याचे सिध्द झाले आहे. यातच विविध वाहनांसाठी लागणारे मनुष्यबळही मोठे आहे. या पार्श्‍वभुमीवर ड्रायव्हरविना चारचाकी वाहनांच्या निर्मितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. यात गुगलसह अनेक कंपन्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. गुगलच्या वाहकाविना चालणार्‍या कारची तर गजबजलेल्या रस्त्यांवरून यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आली आहे. येत्या काही वर्षात गुगलची ही कार प्रत्यक्षात रस्त्यावर अवतरणार आहे. हे सुरू असतांना अवजड वाहनेदेखील ‘स्मार्ट’ बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यात आता मर्सडिज-बेंझ या आघाडीच्या कंपनीने यश मिळवले आहे. या कंपनीच्या तंत्रज्ञांनी ‘फ्युचर ट्रक २०१५’ ही संकल्पना नुकतीच जगासमोर मांडली आहे. या अंतर्गत अठरा चाकी अवजड ट्रकला अर्ध स्वयंचलित पध्दतीने चालवता येते.

यात असणार्‍या अत्यंत शक्तीशाली असे स्टीरिओ कॅमेरे आणि रडारमुळे या ट्रकच्या चारही बाजूंची अचूक स्थिती या प्रणालीचे नियंत्रण करणार्‍या पॅनलला मिळत राहते. यानुसार कारच्या इंजिनाला आज्ञावली देण्यात येते. यात इतका अचूक प्रोग्रॅम टाकण्यात आला आहे की, अगदी रस्त्यावरून अँब्युलन्स जात असल्यास त्या वाहनाला प्राधान्याने ‘साईड’ देण्याची सुविधाही यात आहे. ही प्रणाली सुरू करून ड्रायव्हर अगदी निवांतपणे शेजारच्या खुर्चीवर बसून विसावा घेऊ शकतो. या ट्रकची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. सुमारे ५० मैल प्रतितास इतक्या वेगाने हा ट्रक धावण्यास समर्थ आहे. सध्या कठीण वळणासह अन्य प्रसंगी नेमके काय करावे? याची आज्ञावली यात देण्यात आलेली नाही. यामुळे हा ट्रक अर्ध स्वयंचलित असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र येत्या काळात गुगलच्या कारप्रमाणे पुर्णपणे स्वयंचलित पध्दतीने तो चालवता येऊ शकतो हा आत्मविश्‍वास आता तंत्रज्ञांना आला आहे. याच्या ‘फ्युचर ट्रक २०१५’ नावातूनच हा ट्रक भविष्यकालीन तंत्रज्ञानाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्याचे अधोरेखित झाले आहे. यातून आता कंपन्या अवजड वाहनांनाही स्मार्ट बनविण्याकडे लक्ष देत असल्याचे आपल्याला दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here