डिजेआयच्या संकेतस्थळावर ड्रोनची नोंदणी अनिवार्य

0

डिजेआय कंपनीने आपल्या ग्राहकांकडील प्रत्येक ड्रोनची आपल्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचा अनिवार्य नियम जाहीर केला असून असे न करणार्‍यांच्या उपकरणांना मर्यादा लादण्याचा इशारा दिला आहे.

चीनमधील डिजेआय ही जगातील आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे विविध मॉडेल्स जगभरात लोकप्रिय असून भारतातही याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. डिजेआयने आता आपल्याकडून विकल्या गेलेल्या प्रत्येक ड्रोनधारकाने आपल्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचा नियम जाहीर केला आहे. या माध्यमातून आपल्याकडून विकले गेलेले प्रत्येक ड्रोन हे कायद्यानुसार उड्डाण करत आहे की नाही? याची अचूक माहिती डिजेआयला मिळणार आहे. अर्थात ड्रोनचा गैरवापर यामुळे टळणार असल्याचा दावा डिजेआयने केला आहे. जो ड्रोनधारक नोंदणी करणार नाही त्याचे उपकरण फक्त ५० मीटरच्या (१६४ फुट) परिघात तर ३० मीटर उंच (९८ फुट) उड्डाण करू शकतील. याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या लाईव्ह स्ट्रीमिंगलाही बंद करण्यात येणार असल्याचा इशारा डिजेआयने दिला आहे. अर्थात या माध्यमातून ड्रोनच्या वापरावर मर्यादा लादण्यात येणार आहेत. यामुळे प्रत्येक ड्रोनधारकाने कंपनीच्या अ‍ॅपवर लॉगीन करतांना ही माहिती भरण्याचे सुचित करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत याबाबत अधिक माहिती सादर करण्यात येणार असल्याचेही डिजेआयने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या एफएए अर्थात फेडरल एव्हीएशन एजन्सीने काही दिवसांपुर्वीच छंद म्हणून ड्रोनचा वापर करणार्‍यांना आपल्याकडून परवानगी घेण्याची अथवा नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून अमेरिकेतील ड्रोनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे डिजेआने मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी नोंदणी अनिवार्य केली आहे हे विशेष. भारतात विवाहासह अन्य कार्यक्रमांसाठी ड्रोनद्वारे करण्यात येणारे चित्रीकरण आता प्रचलीत झाले आहे. आपल्या देशात अद्याप तरी ड्रोनचा वापर हा कायदेशीररित्या गुन्हा असला तरी कुणी याला फारसे मनावर घेत नसल्याने अगदी खेड्या-पाड्यांमधूनही याचा वापर होत आहे. मात्र आता डिजेआयचे ड्रोन घेणार्‍यांना या कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदणी अनिवार्य करण्यात आल्याची बाब त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here