आज यु टेलिव्हेन्चर्स या कंपनीने यु युटोपिया या नावाने चार जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारा स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा जगातील सर्वात उत्तम दर्जाचा स्मार्टफोन असल्याचा दावा करण्यात येत आहे.
यु टेलिव्हेन्चर्स ही मायक्रोमॅक्सची उपकंपनी आहे. त्यांनी आधी लॉंच केलेले यू यूरेका, यू यूनीक, यूरेका प्लस, यूफोरिया स्मार्टफोन चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. काही महिन्यांपुर्वीच मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहूल शर्मा यांनी आपण लवकरच यु टेलिव्हेन्चर्स या कंपनीच्या माध्यमातून जगातील सर्वात शक्तीशाली अँड्रॉईड स्मार्टफोन लॉंच करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. याच्या आजवर सादर करण्यात आलेल्या टिझर्सनी ही उत्सुकता अजूनच वाढविली. या औत्सुक्याचा वातावरणात आज यु युफोरिया हा स्मार्टफोन २४,९९९ रूपयांना सादर करण्यात आला.
या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि २५६० बाय १४४० पिक्सल्स अर्थात क्युएचडी क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. आधी नमुद करण्यात आल्यानुसार याची रॅम चार जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी इतके देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन दिसण्यात अत्यंत आकर्षक असा आहे. याची संपुर्ण बॉडी ही मेटलपासून तयार करण्यात आली आहे. याची बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर यात २१ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यु युटोपिया हा स्मार्टफोन फक्त अमेझॉन इंडिया या ई-पोर्टलवरून २६ डिसेंबरपासून मिळणार आहे.