निकॉन डी ८५०ची घोषणा: ४५.७ मेगापिक्सल्स सेन्सर, फोर-के व्हिडीओ

0

निकॉन कंपनीने आपला निकॉन डी ८५० हा नवीन डीएसएलआर कॅमेरा ग्राहकांना सादर केला असून यात तब्बल ४५.७ मेगापिक्सल्स सेन्सर, फोर-के व्हिडीओ चित्रीकरणासह अनेक उत्तमोत्तम फिचर्स समावेश आहे.

निकॉन डी ८५० या मॉडेलची जगभरात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करण्यात येत होती. याला विराम देत कंपनीने आपला हा डीएसएलआर कॅमेरा जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करत याचे अनावरण केले. हा कॅमेरा कंपनीने आधी लाँच केलेल्या डी ८१० या कॅमेर्‍याची पुढील आवृत्ती आहे. पुढील महिन्यात हे मॉडेल ग्राहकांना ३२९९.९५ डॉलर्स (सुमारे २.२५ लाख रूपये) इतक्या मूल्यात खरेदी करता येणार आहे. कॅननने अलीकडेच लाँच केलेल्या इओएस ५डी मार्क ४ या प्रिमीयम मॉडेलला निकॉन डी ८५० तगडे आव्हान देईल असे मानले जात आहे.

निकॉन डी ८५० या मॉडेलमध्ये तब्बल ४५.७ मेगापिक्सल्स क्षमतेचे सीएमओएस सेन्सर प्रदान करण्यात आले आहे. अर्थात यातून अतिशय सुस्पष्ट प्रतिमा काढणे शक्य आहे. या कॅमेर्‍यात निकॉन कंपनीनेच विकसित केलेले एक्सपीडी ५ हे इमेज प्रोसेसर देण्यात आले आहे. याच्या मदतीने ७ फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीने दर्जेदार चित्रीकरण करता येते. यात ६४-२५,६०० इतकी आयओएस रेंज प्रदान करण्यात आली आहे. तसेच यात ९९ क्रॉसटाईप ऑटो फोकस पॉइंटसह १५३ पॉईंटची ऑटो-फोकस प्रणाली असेल. हा कॅमेरा ३० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीने फोर-के तर १२० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीने फुल एचडी क्षमतेचे चित्रीकरण करू शकतो. यात टाईम-लॅप्स व्हिडीओ मोडदेखील देण्यात आला आहे. तर यात सायलेंट शुटींग मोडदेखील असेल. निकॉन डी ८५० या मॉडेलच्या मागील बाजूस विविध फंक्शन्सच्या कार्यान्वयानासाठी ३.२ इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत उत्तम व्ह्यू-फाईंडरही असेल. स्टोअरेजसाठी यात दोन स्लॉट असतील. तर वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथसह यात निकॉन कंपनीनेच विकसित केलेली स्नॅपब्रीज ही प्रणाली कनेक्टीव्हिटीसाठी देण्यात आली आहे. स्नॅपब्रीजच्या मदतीने कॅमेरा बंद असतांनाही यातील प्रतिमा स्मार्टफोनवर ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे. तर यात एचडीएमआय आणि हेडफोन/मायक्रोफोन सॉकेटदेखील प्रदान करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here