नेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश

0
युट्युब ओरिजीनल्स-नेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर;

नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवांना आव्हान देण्यासाठी युट्युब आपली ओरिजीनल्स ही सेवा लवकरच भारतात सुरू करणार आहे.

भारतीय बाजारपेठेत ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होऊ लागली आहे. यात नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ आदींसारख्या सेवा आघाडीवर आहेत. यावर युजर चित्रपट, डॉक्युमेंटरीज, दूरचित्रवाणी कार्यक्रम, टॉक शोज आदींसह मनोरंजनपर कार्यक्रम पाहू शकतो. अनेक कंपन्यांनी या दोन्ही सेवांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असला तरी यात फारसे यश लाभले नाही. या पार्श्‍वभूमिवर, आता युट्युब ओरिजीनल्स ही सेवा भारतीय ग्राहकांना लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त ब्लुमबर्ग या वृत्तसंस्थेने दिले आहे. नावातच नमूद असल्यानुसार याच्या माध्यमातून युट्युबनेच निर्मित केलेले कंटेंट ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. यामध्ये विविध वेबसेरीज, रिअ‍ॅलिटी शो, टॉक शो आदींचा समावेश असू शकतो. याबाबत अद्याप युट्युबने अधिकृत घोषणा केली नाही.

भारतीय बाजारपेठेत मूल्य हा सर्वात महत्वाचा घटक आहे. यामुळे अन्य राष्ट्रांच्या तुलनेत भारतात युट्युब ओरिजीनल्स ही सेवा किफायतशीर मूल्यात सादर करण्यात येईल हे स्पष्ट आहे. यासोबत यावरील सर्व प्रिमीयम कंटेंट हे मोफतसुध्दा उपलब्ध राहणार असले तरी यात जाहिराती देण्यात येणार आहेत. म्हणजेच दरमहा विहीत शुल्क भरणार्‍या ग्राहकाला जाहिरातींच्या अडथळ्याशिवाय कार्यक्रम पाहता येतील. तर याचा मोफत आनंद घेणार्‍यांना जाहिरातयुक्त कार्यक्रम पहावे लागणार आहेत. भारतीय ग्राहकांची अभिरूची लक्षात घेऊन युट्युब विविध आकर्षक कार्यक्रमांना या सेवेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याची माहिती या वृत्तात देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत भारतात अमेझॉन प्राईम व्हिडीओ ही सेवा ४०० रूपये प्रति-वर्ष इतक्या मूल्यात उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सचे दर ५०० रूपये प्रति-महिना आणि यापेक्षा जास्त आहेत. तर हॉटस्टार ही भारतीय सेवा १९९ रूपये प्रति-महिना इतक्या दरात उपलब्ध आहे. या पार्श्‍वभूमिवर, युट्युब ओरिजीनल्सचे दर नेमके किती राहणार? याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here