नोकियाचे दोन नवीन हँडसेट

0

एचएमडी ग्लोबल या कंपनीने विख्यात नोकिया या ब्रँडनेमला पुनर्जिवीत करत नोकिया १५० आणि नोकिया १५० ड्युअल सीम हे दोन मोबाईल हँडसेट लाँच करण्याची घोषणा केली आहे.

नोकिया कंपनीने आधीच आपल्या मोबाईल हँडसेट उत्पादनाचा व्यवसाय मायक्रोसॉफ्ट कंपनीला विकला आहे. याप्रसंगी झालेल्या करारानुसार डिसेंबर २०१६ पर्यंत नोकिया कंपनी मोबाईल उत्पादन करू शकणार नव्हती. मात्र ही मुदत संपत असतांना नोकियाने पुनरागमनाचे संकेत दिले होते. यासाठी कंपनीने एचएमडी ग्लोबल या फिनलँडमधील कंपनीशी दहा वर्षांचा करार केला आहे. एचएमडीने काही दिवसांपूर्वीच नवीन मॉडेल्स लाँच करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्‍वभूमिवर आता नोकिया १५० आणि नोकिया १५० ड्युअल सीम हे दोन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. हे अत्यंत किफायतशीर दरातील फिचर फोन आहेत. कर वगळता याचे मुल्य २६ अमेरिकन डॉलर्स इतके राहणार आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये समान फिचर असून दुसर्‍यात फक्त ड्युअल सीमकार्डचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये पॉली-कार्बोनेटपासून तयार करण्यात आलेली बॉडी देण्यात आली आहे. दोघांमध्ये २४० बाय ३२० म्हणजेच क्युव्हिजीए क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा असेल. यात एलईडी फ्लॅशसह क्युव्हिजीए क्षमतेचा कॅमेरा असेल. यातील १०२० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी तब्बल २२ तासांपर्यंत टॉकटाईम प्रदान करणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याची बॅटरी मायक्रो-युएसबी चार्जरच्या सहाय्याने चार्ज होऊ शकते. तसेच या दोन्ही मॉडेल्समध्ये एलईडी फ्लॅशलाईटही असेल. हे मोबाईल नोकियाच्या ३०+ या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारे असतील.

नोकियाच्या या दोन्ही हँडसेटमध्ये स्नेक झेंजिया आणि निट्रो रेसींग हे गेम प्रिलोडेड अवस्थेत असतील. यासोबत मायक्रो-युएसबी, एव्ही कनेक्टर, ब्ल्यू-टुथ, एफएम रेडिओ आणि एमपी३ प्लेअर आदी फिचर्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स पुढील वर्षाच्या प्रारंभी जागतिक बाजारपेठेत ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here