पहिला क्लाऊड स्टोअरेज स्मार्टफोन

0

स्मार्टफोनधारकांना स्टोअरेजची सर्वात मोठी समस्या असते. आता मात्र नेक्स्टबीट कंपनीने क्लाऊड स्टोअरेजवर आधारित रॉबिन हा स्मार्टफोन लॉंच करून यावर तोडगा शोधला आहे.

nextbit_robin

बॅटरी आणि स्टोअरेज हे स्मार्टफोनचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. दीर्घ काळ टिकणारी बॅटरी आणि जास्तीत जास्त स्टोअरेजला बहुतांश युजर्स प्राधान्य देत असतात. यामुळे जवळपास प्रत्येक स्मार्टफोन तयार करतांना या दोन्ही घटकाकडे विशेष लक्ष देण्यात येते. इंटरनल स्टोअरेजला सपोर्ट म्हणून मायक्रो-एसडी कार्डचा पर्याय शोधण्यात आला आहे. याच्या मदतीने स्टोअरेज एक्सपांड करता येते. मात्र या कार्डच्या साठवण क्षमतेलाही मर्यादा आहेत. यामुळे अनलिमिटेड स्टोअरेज असल्यास किती मज्जा येईल! असे आपल्याला नेहमी वाटत असते. नेमकी हीच बाब लक्षात घेत नेक्स्टबीट या कंपनीने क्लाऊड स्टोअरेजची सुविधा असणारा रॉबीन हा स्मार्टफोन सादर केला आहे.

रॉबीन या मॉडेलमध्ये छायाचित्रे, व्हिडीओज आधी इंटरनल स्टोअरेजवर सेव्ह करण्यात येतात. यानंतर या मॉडेलला चार्जर लावलेले असतांना तसेच वाय-फाय सुरू असतांना हा डाटा आपोआप क्लाऊड स्टोअरेजवर अपलोड करण्यात येतो. नेक्स्टबीट कंपनीने आपल्या प्रत्येक वापरकर्त्याला तब्बल १०० जीबी मोफत डाटा अपलोडींगची सुविधा दिली आहे. याच्या पुढे अल्प मुल्यावर स्टोअरेज उपलब्ध होणार आहे. अर्थात हा स्मार्टफोन अन्य उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज आहे.

या मॉडेलमध्ये १०८०*१९२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी तर इंटरनल स्टोअरेज ३२ जीबी इतके आहे. (क्लाऊडवर डाटा अपलोड होण्याआधी यावरच स्टोअर होणार आहे.) यात फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. याची बॅटरी २६८० मिलीअँपिअर क्षमतेची असून यात १३ व ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे आहेत. हा स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध होण्याआधी ‘किकस्टार्टर’ या क्राऊडफंडिंग जमा करणार्‍या वेबसाईटवर भांडवल जमा करण्यात येत आहे. येथे नोंदणी करणार्‍या पहिल्या १००० ग्राहकांना तो २९९ डॉलर्सला मिळणार आहे. मात्र यानंतरच्या ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन ३४९ डॉलर्स (सुमारे २३,१०० रूपये) मिळेल. याच मुल्यात तो बाजारपेठेत लॉंच होण्याची शक्यता आहे. २५ हजार रूपयांच्या आत इतके उत्तम फिचर्स असणारा हा स्मार्टफोन जगभरात धमाल करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here