गुगलने स्टायलस पेनचा सपोर्ट असणारा व क्रोम ओएसवर चालणार्या स्लेट टॅबलेट मॉडेलची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.
गुगलने आपल्या वार्षीक लाँचींग कार्यक्रमात बहुप्रतिक्षित पिक्सेल मालिकेतील दोन स्मार्टफोन्ससह अन्य काही उपकरणांचेही अनावरण केले. यामध्ये पिक्सेल स्लेट टॅबलेट या मॉडेलचाही समावेश आहे. हा टु-इन-वन अर्थात हायब्रीड या प्रकारातील टॅबलेट आहे. अर्थात याला एकाच वेळी टॅबलेट आणि लॅपटॉप या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. यासाठी याला स्वतंत्र कि-बोर्डदेखील देण्यात आलेला आहे. याशिवाय, यात स्टायलस पेनचा समावेशही करण्यात आला आहे. याच्या मदतीने नोटस् घेण्यासह विविध प्रकारची रेखाटनेही करता येणार आहेत.
गुगलच्या पिक्सेल स्लेट टॅबलेटमध्ये १२.३ इंच आकारमानाचा आणि ३,००० बाय २,००० पिक्सल्स क्षमतेचा टचस्क्रीन मोलेक्युलर डिस्प्ले देण्यात आलेला असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५चे संरक्षक आवरण दिले आहे. यावर पिक्सेल इंप्रिंट हे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. क्रोम ओएसच्या ताज्या आवृत्तीत अलीकडेच याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या टॅबलेटचा अभेद्य सुरक्षा कवच मिळाल्याचे मानले जात आहे. याच्या पाच विविध आवृत्त्यांमध्ये इंटेल सेलेरॉनपासून ते कोअर आय ७ प्रोसेसर्सचे पर्याय देण्यात आलेले आहेत. याच्या विविध मॉडेल्समध्ये ४ ते १६ जीबी रॅम देण्यात आलेली असून स्टोअरेजसाठी ३२ ते २५६ जीबीपर्यंतचे पर्याय दिलेले आहेत.
गुगल स्लेट टॅबलेट मॉडेलच्या पुढील आणि मागील बाजूस प्रत्येकी ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यातील फ्रंट कॅमेर्यात वाईड अँगल व्ह्यू देण्यात आल्यामुळे विस्तृत भागावरील सेल्फी घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात खास गुगलच्या पिक्सेल मालिकेतील स्मार्टफोनसाठी विकसित केलेल्या गुगल कॅमेरा अॅपचा सपोर्टदेखील दिलेला आहे. यात ऑडिओ जॅक दिलेले नाही. तर युएसबी टाईप-सी कनेक्टरच्या मदतीने हेडफोन संलग्न करता येणार आहे. यात मॅक्स-ऑडिओ ध्वनी प्रणाली इनबिल्ट अवस्थेत दिलेली असून याच्या मदतीने अतिशय सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यातील दोन्ही मायक्रोफोन हे दर्जेदार आहेत. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात ब्ल्यु-टुथ व वाय-फायसह कनेक्टीव्हिटीचे अन्य पर्याय देण्यात आलेले आहेत. याच्या विविध मॉडेल्सचे मूल्य ५९९ ते १५९९ डॉलर्सच्या दरम्यान आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे मॉडेल्स भारतात लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.