फेसबुकचे व्यसन लागणार्‍या फिचर्सबाबत गौप्यस्फोट

0
फेसबुकचे व्यसन,फेसबुक, facebook addiction, facebook

फेसबुकचे व्यसन लावणार्‍या काही फिचर्सचा या सोशल नेटवर्कींग साईटमध्ये समावेश करण्यात आला असून याचा युजर्सच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बीबीसीने केला आहे.

अनेकांना फेसबुकचे व्यसन जडले असल्याचे आपल्याला दिसून येते. अलीकडच्या काळात तर सोशल मीडियाच्या व्यसनामुळे अनेक मानसिक विकार जडत असून पर्यायाने याचा युजर्सच्या शरीरासह मन आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होत असल्याची काही उदाहरणे आपल्याला समाजात दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, सँडी पार्कीलास या फेसबुकच्या माजी प्लॅटफॉर्म मॅनेजरने बीबीसीच्या पॅनोरामा या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये या अनुषंगाने अनेक बाबींवर प्रकाश टाकत धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या मते फेसबुकमधील अनेक फिचर्स हे युजरला सोशल मीडियाच्या व्यसनाधिनतेकडे घेऊन जात असल्याची माहिती या कंपनीला आहे. किंबहुना हे फिचर्स याच पध्दतीने तयार करण्यात आले आहेत. याचा विशेष करून पौगंडावस्थेत असणार्‍या युजर्सवर अतिशय विपरीत परिणाम होत असल्याचे सिध्द झालेले असल्याची माहिती त्यांनी दिली. अ‍ॅडीक्टीव्ह टेक्नॉलॉजीबाबत फेसबुकचे प्रशासन फारसे गंभीर नाही. या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांची त्यांना माहिती असल्याचा दावादेखील सँडी पार्कीलास यांनी केला आहे.

दरम्यान, या सर्व धक्कादायक बाबींबाबत द टेलीग्राफ या वर्तमानपत्राने सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला असून यातील अन्य घटकांवरही उजेड टाकण्यात आला आहे. यात विशेष बाब म्हणजे फेसबुकचे संस्थापक सदस्यांपैकी एक असणार्‍या सीन पार्कर यांनीही अलीकडे याच प्रकारचा आरोप केला आहे. मानसशास्त्रीय तंत्राच्या माध्यमातून युजर्सचे शोषण करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर फेसबुकचे लाईक बटन विकसित करणार्‍या चमूच्या सदस्या लेह पर्लमॅन यांनी टिन एजर्सला सोशल मीडिया जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. आपण कधीपासूनच फेसबुक वापरणे बंद केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कारण फेसबुकवरील लाईकचा आपल्या मनोदशेवर परिणाम होत असल्याची अनुभूती आपण स्वत: घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर अझा रासकीयन या फेसबुकच्या अनलिमिटेड स्क्रोलला विकसित करणार्‍या माजी अभियंत्यानेही यातील एक पैलू उघड केला आहे. त्याच्या मते फेसबुकच्या स्क्रीनवर आपल्याला जे दिसते त्यामागे शेकडो अभियंते कार्यरत असतात. आपल्याला कोणत्या तरी घटकाच्या माध्यमातून फशी पाडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, फेसबुकने खास बालकांसाठी विकसित केलेल्या किडस् मॅसेंजर अ‍ॅपबद्दलही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या माध्यमातून अबोध वयातील मुलांना टार्गेट केले जात असून याचे अतिशय भयंकर दुष्परिणाम समोर येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे फेसबुकने या सर्व आरोपांना नाकारले आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून कुणीही आपल्या मित्रांसोबत जुळून त्याने दोन क्षण विरंगुळ्यात घालवावे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. यात कुणालाही मानसिक व्यसनाधिनतेकडे नेणारे काहीही नसल्याचा दावा फेसबुकने केला आहे. तथापि, बीबीसी आणि टेलीग्राफ यांनी सोशल मीडियातील नकारात्मक बाजूचा भयावह पैलू उजेडात आणल्याचे कुणाला नाकारता येणार नाही.