फ्लिपकार्टचे नवीन शॉपींग पोर्टल कार्यान्वित

0

फ्लिपकार्टने आता टूगुड या नावाने नवीन शॉपींग पोर्टल सुरू केले असून ई-बे इंडियाला बंद केल्यानंतर याची घोषणा करण्यात आली आहे.

फ्लिपकार्टने गत महिन्यात आपल्या मालकीचे ई-बे इंडिया हे पोर्टल बंद करण्याचे जाहीर केले होते. यावर रिफर्बीश्ड अर्थात थोडा प्रॉडक्शन फॉल्ट असणार्‍या तसेच सेकंड हँड प्रॉडक्टची खरेदी-विक्री होत होती. भारतात या प्रकारातील वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्यामुळे याला चांगला प्रतिसादही लाभला होता. तथापि, फ्लिपकार्टने अचानकपणे याला बंद करण्याची घोषणा करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. यासोबत फ्लिपकार्टने आपण नवीन पोर्टल सुरू करण्याचेही सूचित केले होते. १४ ऑगस्ट रोजी ई-बे इंडिया हे पोर्टल बंद करण्यात आले. यानंतर काही दिवसांनी फ्लिपकार्टने आपण टूगुड या नावाने याच प्रकारातील संकेतस्थळ सुरू करत असल्याची घोषणा केली आहे.

या संकेतस्थळावर पहिल्यांदा स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेटसह अन्य इलेक्ट्रॉनिक अ‍ॅसेसरीजला उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या हे पोर्टल फक्त मोबाईल वेब ब्राऊजरच्या माध्यमातून वापरता येत आहे. तथापि, लवकरच याला स्मार्टफोन अ‍ॅप तसेच डेस्कटॉपवरूनही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. खरं तर रिफर्बीश्ड या प्रकारातील वस्तूंची खरेदी-विक्रीत मोठी जोखीम असते. मात्र आपण पूर्ण तपासणी करूनच आपल्या संकेतस्थळावर संबंधीत प्रॉडक्टची लिस्टींग करणार असल्याची ग्वाही फ्लिपकार्टने दिली आहे. यामध्ये कंपनीकडून दिल्या जाणार्‍या गॅरंटीकडेही विशेष लक्ष असेल असे नमूद करण्यात आले आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. टूगुडच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांमध्ये २० अब्ज डॉलर्सइतकी उलाढाल करण्याचे उद्दीष्ट फ्लिपकार्टने ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here