अनेक वर्षानंतर एलजी आणि सॅमसंग या कंपन्यांनी फ्लिपफोनचे मॉडेल्स सादर केले आहेत. या माध्यमातून पुन्हा फ्लिपफोनचे युग येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
स्मार्टफोनचे आगमन होण्याआधी फ्लिपफोन बर्यापैकी लोकप्रिय होते. मात्र टचस्क्रीन तंत्रज्ञानाचे आगमन झाल्यानंतर फ्लिपफोनची लोकप्रियता ओहोटीला लागली. अवघे जग टचस्क्रीनयुक्त स्मार्टफोनच्या प्रेमात पडल्यानंतर ते हे फोन इतिहासजमा झाले. बहुतांश कंपन्यांनी फ्लिपफोनचे उत्पादन थांबविले. मात्र या वर्षी एलजी आणि सॅमसंग या दोन आघाडीच्या कंपन्यांनी फ्लिपफोन सादर केले आहे.
मध्यंतरी अमेरिकेत करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणातून १८ ते २४ वयोगटातील १५ टक्के तर २५ ते ३४ वयोगटातील १३ टक्के लोक स्मार्टफोनचा वापर करत नसल्याचे अधोरेखित झाले होते. यातच मध्यमवयीन नागरिकांनाही टचस्क्रीन स्मार्टफोनचा वापर करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून सॅमसंगने ‘मास्टर ड्युअल फ्लिप’ हे मॉडेल सादर करण्याची घोषणा केली आहे. यात एक आत (३.३ इंच) आणि एक बाहेर (२.२ इंच) असे दोन स्क्रीन देण्यात आले आहे. यात ३ मेगापिक्सलचा मुख्य आणि १.३ मेगापिक्सलचा उपकॅमेरा दिलेला आहे. महत्वाची बाब म्हणजे बराच काळ या फोनचा वापर न झाल्यास सेट केलेल्या संपर्क क्रमांकाला याचे लोकेशन देण्याची सुविधा यात प्रदान करण्यात आली आहे. यातील रॅम आणि स्टोअरेजबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. प्रारंभी हा फ्लिपफोन कोरियात सादर करण्यात येत असून नंतर तो जगभरात उपलब्ध करण्यात येणार आहे.
तत्पुर्वी एलजी या विख्यात कंपनीनेही वाईन स्मार्ट क्लॅमशेल हा फ्लिपफोन सादर केला आहे. यात ३.५ इंच आकारमानाचा एचव्हीजीए डिस्प्ले असून तो अँड्रॉईडच्या ४.४ अर्थात किटकॅट व्हर्शनवर चालणारा आहे. तो १.२ गेगाहर्टझ क्वाडकोअर प्रोसेसरवर चालणारा असून त्यात आठ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. एलजीनेही सध्या हा फ्लिपफोन फक्त दक्षिण कोरियात लॉंच केला असून तो नंतर जागतिक बाजारपेठेत उतरवण्यात येणार आहे.
एलजी आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांनी फ्लिपफोनच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत केल्याचे यातून निदर्शनास आले आहे.