बायडूची स्मार्ट सायकल

0

सध्या सर्व उपकरणे स्मार्ट होत असतांना बायडू या चिनी कंपनीने स्मार्ट सायकल तयार केली आहे.

baidu_dubike

स्मार्ट वाहनांचा उल्लेख येताच सर्वप्रथम गुगलची ‘ड्रायव्हरलेस कार’ आपल्यासमोर येते. याचप्रमाणे अन्य कंपन्यांनीही वाहकाविना चालणारी स्मार्ट वाहने विकसित करण्यास प्रारंभ केला आहे. यानंतर अशाच प्रकारातील ट्रक तसेच अन्य वाहनेही विकसित करण्यास वेग आला आहे. यात आता बायडू या चिनमधील मोठ्या इंटरनेट कंपनीने उडी घेतली आहे.

बायडू हे चिनमधील गुगल म्हणून विख्यात आहे. ‘सर्च’ मध्ये तर बायडूला चिनमध्ये नजीकचा स्पर्धकच नाही. याचसोबत या कंपनीने आता अन्य क्षेत्रांमध्येही दमदार पाऊल टाकले आहे. या अनुषंगाने बायडूने ‘द इन्स्टिट्युट ऑफ लर्नींग’ या सहयोगी कंपनीच्या माध्यमातून ‘डुबाईक’ ही स्मार्ट सायकल तयार केली आहे. ऑक्टोबर महिन्यात याबाबत घोषणा करण्यात आली असली तरी आज सर्वप्रथम या स्मार्ट सायकलविषयी प्रथमच अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

बायडूची डुबाईक ही स्मार्ट सायकल गुगलच्या ड्रायव्हरलेस कारप्रमाणे वाहकाशिवाय चालणारी नाही. मात्र यात अनेक स्मार्ट फिचर्स आहेत. यात अनेक संवेदके (सेन्सर्स) लावण्यात आलेली आहेत. याच्या मदतीने सायकलस्वार नेमक्या किती वेगाने जातोय? तो किती दाबाने पायडल मारतोय? याप्रसंगी त्याच्या ह्दयाची गती किती आहे? त्याच्या किती कॅलरीज खर्च झाल्यात आदी माहिती जमा होऊन ती एका मोबाईल ऍप्लीकेशनकडे जाते. ही माहिती सोशल नेटवर्कीग साईटवर शेअर करण्याची व्यवस्थादेखील आहे. विशेष म्हणजे पायडलच्या माध्यमातून वीज निर्मतीची सुविधादेखील यात आहे. तसेच या स्मार्ट सायकलमध्ये उपग्रहीय नेव्हिगेशन सिस्टिम अर्थात ‘जीपीएस’देखील लावण्यात आले आहे. याच्या मदतीने सायकलस्वाराला नेमके कुठे जायचे याबाबत मार्गदर्शनही मिळते. या स्मार्ट सायकलची सर्व प्रणाली बायडूने खास तयार केलेल्या ऑपरेटींग प्रणालीवर चालते. या स्मार्ट सायकलच्या किंमतीबाबत माहिती देण्यात आली नसली तरी या वर्षाच्या अखेरीत ती ग्राहकांच्या सेवेत रूजू होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here