युट्युब या व्हिडीओ शेअरींग साईटच्या भारतीय आवृत्तीला १० वर्षे पूर्ण झाली असून आता देशातील तब्बल ८० टक्के युजर्स याचा वापर करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मार्च २००८ मध्ये गुगलने युट्युब इंडिया ही स्वतंत्र साईट सुरू केली होती. याला १० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून गुगलने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच यानिमित्त युट्युब इंडियातर्फे आकडेवारी सादर करण्यात आली आहे. यानुसार आता भारतात इंटरनेटचा वापर करणार्यांपैकी तब्बल ८० टक्के युजर्स युट्युब साईटचा नियमीत वापर करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातील ३०० युट्युब चॅनल्सला १० लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. २०१४ साली हाच आकडा फक्त १४ इतका होता हे विशेष. भारतात अत्यंत किफायतशीर दरातील स्मार्टफोनचे हँडसेट उपलब्ध झाले आहेत. याच्या जोडीला विविध सेल्युलर कंपन्यांना अत्यल्प दराचे डाटा प्लॅन्स सादर केले आहेत. यामुळे स्मार्टफोन युजर्स मोठ्या प्रमाणात व्हिडीओ पाहत असून त्यांचे पहिले प्राधान्य अर्थातच युट्युबला असल्याचेही गुगलने सादर केलेल्या आकडेवारीतून अधोरेखीत झाले आहे.