सॅमसंगने सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस४ हे टु-इन-वन या प्रकारातील मॉडेल आता भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
सॅमसंग कंपनीने ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी आयोजित केलेल्या लाँचींग कार्यक्रमात सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस४ या मॉडेलला सादर केले होते. हे स्टायलस पेनचा सपोर्ट असणारे टु-इन-वन या प्रकारातील मॉडेल आहे. अर्थात याला लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. हे मॉडेल आता भारतीय ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याचे मूल्य ५७,९०० रूपये इतके आहे. ग्राहकांना हे मॉडेल अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलसह देशभरातील सॅमसंगच्या शॉपीजमधून २० ऑक्टोबरपासून खरेदी करता येणार आहे. यासोबत कंपनीने काही ऑफर्सदेखील जाहीर केल्या आहेत. यात प्रामुख्याने एचडीएफसी कंपनी ५ हजार रूपयांचा कॅशबॅक देणार आहे. जिओनेदेखील यासोबत २,७५० रूपयांचा कॅशबॅक जाहीर केला आहे.
गॅलेक्सी टॅब एस४ या मॉडेलमध्ये १०.५ इंच आकारमानाचा आणि क्वॉड एचडी अर्थात २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा तथा १६:१० अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये डॉल्बी अॅटमॉस या प्रणालीने सज्ज असणारे चार स्पीकर्स असून याच्या मदतीने सुश्राव्य संगीताचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी असून स्टोअरेज ६४ जीबी इतके आहे. हे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. यात यातील ७,३०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीमध्ये फास्ट चार्जींगचा सपोर्ट दिलेला आहे. याला एकदा चार्ज केल्यानंतर १६ तासांचा बॅकअप मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे. यामध्ये फेशियर रिकग्नीशन आणि आयरिस स्कॅनर प्रणालींचा समावेश करण्यात आलेला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस आदी पर्याय आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी टॅबची खासियत असणार्या स्टायलस पेनचा सपोर्ट या मॉडेलमध्येही प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने डिस्प्लेवर रेखाटन करता येणार असून नोटस्देखील घेता येणार आहे. तसेच सॅमसंगने पहिल्यांदाच आपल्या टॅबलेटमध्ये सॅमसंग डेक्स या प्रणालीचा सपोर्ट दिला आहे. यामुळे याला मोठ्या डिस्प्लेशी सहजपणे कनेक्ट करता येणार आहे.