मायक्रोमॅक्स कंपनीच्या यु सेरीजमधील युरेका या सायनोजेनमोड ऑपरेटींग प्रणालीवर चालणार्या स्मार्टफोनची अमेझॉनवर विक्रीपुर्व नोंदणी सुरू झाली आहे.
कालच मायक्रोमॅक्स कंपनीने आपल्या ‘यु’ या सेरीजमधील युरेका हा पहिला स्मार्टफोन लॉंच करण्याची घोषणा केली होती. या स्मार्टफोन सायनोजेनमोड या अँड्रॉईडपासून विकसित केलेल्या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा आहे. सायनोजेनमोड ही प्रणाली भारतात वापरण्याचे हक्क मायक्रोमॅक्स कंपनीला मिळालेले आहेत. यामुळे वन प्लस कंपनीच्या वन प्लस वन या स्मार्टफोन विक्रीवर बंदी लादण्यासाठी मायक्रोमॅक्स न्यायालयात गेली होती. न्यायालयानेही वन प्लस वनवर तात्पुरती बंदी लादली आहे. या पार्श्वभुमीवर आता यु या सेरीजमधील युरेका हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्सने सादर केला आहे. ५.५. इंच एचडी डिस्प्ले तसेच १.५ गेगाहर्टझ ऑक्टाकोअर प्रोसेसरनेयुक्त या स्मार्टफोनची रॅम दोन जीबी तर इंटर्नल स्टोअरेज १६ जीबी असून ते ३२ जीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे. यात १३ मेगापिक्सल्सचा मुख्य तर पाच मेगापिक्सल्सचा समोरील बाजूस असणारा कॅमेरा आहे. याचे मुल्य ८,९९९ रूपये इतके आहे. इतक्या कमी मुल्यात उत्तम फिचर्सनी युक्त हा स्मार्टफोन धमाल करण्याची शक्यता आहे. यात फोर-जीची कनेक्टीव्हिटीदेखील देण्यात आली आहे.
मायक्रोमॅक्स कंपनीचा युरेका हा स्मार्टफोन एक्सक्लुझिव्हली अमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर सादर करण्यात आला आहे. आज दुपारपासून याची नोंदणी सुरू झाली असून १३ जानेवारीनंतर फ्लॅश सेलच्या माध्यमातून तो ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.