मायक्रोमॅक्स या कंपनीने आता ई-वाहनांच्या उत्पादनात उतरण्याचा निर्णय घेतला असून लवकरच दुचाकी अणि तीनचाकींना सादर करण्यात येणार आहे.
मायक्रोमॅक्स कंपनीने जाणीवपूर्वक आपल्या उत्पादनांमध्ये वैविध्य जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्टफोनसोबत टॅबलेट, लॅपटॉप आदींपासून ते एयर कंडिशनरपर्यंतची विविध उत्पादने मायक्रोमॅक्स कंपनीने सादर केली आहेत. यातच आता ही कंपनी ई-वाहने उत्पादीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी लागणारा परवाना मायक्रोमॅक्स कंपनीला मिळालेला असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
मायक्रोमॅक्स कंपनी पहिल्या टप्प्यात दुचाकी आणि तीनचाकी सादर करण्याची शक्यता आहे. सध्या तीनचाकी ई-रिक्षा लोकप्रिय होत असून केंद्र सरकारनेही याला प्राधान्य देण्याचे धोरण अंमलात आणलेले आहे. यामुळे मायक्रोमॅक्स कंपनीदेखील यालाच प्राधान्य देणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्मार्टफोनसह अन्य उपकरणांच्या क्षेत्रात मायक्रोमॅक्स कंपनीने आपला दबदबा निर्माण केला आहे. याच प्रकारची जादू ई-वाहनांच्या निर्मितीतही करता येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.