शाओमीने आपल्या मीयुआय १० या ताज्या ऑपरेटींग सिस्टीमचे अनावरण केले असून या कंपनीच्या विविध हँडसेटला ही प्रणाली अपडेटच्या स्वरूपात मिळणार आहे.
शाओमी आपल्या ग्लोबल लाँचींग कार्यक्रमात मीयुआय (MIUI) १० या आपल्या नवीन ऑपरेटींग सिस्टीमला लाँच करणार असल्याची माहिती कधीपासूनच समोर आली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या कार्यक्रमात मीयुआय १० चे अनावरण करण्यात आले. ही प्रणाली अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर आधारित असून ती शाओमीच्या ग्राहकांना युजर इंटरफेसच्या माध्यमातून प्रदान करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात बहुतांश उच्च श्रेणीत प्रदान करण्यात येणार्या फंक्शन्सला डोळ्यासमोर ठेवून मीयुआय १० या आवृत्तीत आवश्यक ते फिचर्स देण्यात आले आहेत. यातील महत्वाचे फिचर्स खालीलप्रमाणे आहेत.
* फुल स्क्रीन सपोर्ट : मीयुआय १० मध्ये फुल स्क्रीन डिस्प्लेचा सपोर्ट देण्यात आला आहे. सध्या फ्लॅगशीप व मध्यम श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये या प्रकारातील डिस्प्ले देण्यात येत असला तरी लवकरच किफायतशीर दरातील मॉडेलमध्येही हे फिचर येण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने शाओमीने आपल्या या आवृत्तीत संबंधीत फिचरचा सपोर्ट प्रदान केला आहे.
* न्यू अॅप जेस्चर्स : मीयुआर १० या प्रणालीत होम, बॅक आणि रिसेंट मेन्यू या बॅटन्सचे रिडिझाईन करण्यात आले आहे. यात स्क्रीनच्या विविध भागांमध्ये स्वाईप करूनही याचा वापर करता येणार आहे. यामुळे युजरला सुलभ सुविधा मिळणार आहे. यात स्वाईप करून टास्क डिलीट करता येणार आहे. तर लाँग प्रेस करण्यासही विविध फंक्शन्सची जोड देण्यात आली आहे.
* कृत्रीम बुध्दीमत्ता : मीयुआय १० प्रणालीत कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंडिलेजीयन्सचा सपोर्टदेखील दिलेला आहे. याच्या मदतीने मोबाईल आणि विविध अॅप्सच्या वापराचे व्यवस्थापन अतिशय परिणामकारक पध्दतीने करण्यात येणार आहे.
* कॅमेरा इफेक्ट: मीयुआय १० या प्रणालीत एआयच्याच मदतीने कॅमेर्यांमध्ये बोके तसेच विविध इफेक्ट देण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. यामुळे अर्थातच दर्जेदार छायाचित्रे घेता येतील.
* कार मोड : या नवीन आवृत्तीमध्ये कार मोड देण्यात आला आहे. यात युजर कार ड्राईव्ह करत असतांना आपल्या मोबाईलवरून नेव्हिगेशनसह अन्य बाबींचा आनंद घेऊ शकणार आहे. या मोडसाठी स्वतंत्र नेव्हीगेशन प्रणाली देण्यात आली आहे.
* नाविन्यपूर्ण नोटिफिकेशन्स : मीयुआय १० या आवृत्तीत विविध नोटिफिकेशन्सला अतिशय सुलभ पध्दतीत वर्गीकृत करता येणार आहे. यासाठी स्वतंत्र साऊंड इफेक्टदेखील देण्याची सुविधा यात प्रदान करण्यात आली आहे.