युट्युबचा मिनी प्लेअर संगणकावर दाखल

0
युट्युब मिनी प्लेअर, youtube mini player

युट्युबने आता संगणकासाठी मिनी प्लेअर सादर केले असून यामुळे युजर्सला वेब ब्राऊजींग करतांनाही या साईटवरील व्हिडीओ पाहता येणार आहे.

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटवरून जगभरात मोठ्या प्रमाणात व्हिडीओज पाहिले जातात. या संकेतस्थळाने आधीच आपल्या स्मार्टफोन युजर्ससाठी मिनी प्लेअर प्रदान केला आहे. याच्या अंतर्गत युजरने युट्युब साईटवरून अन्य व्हिडीओ सर्च करण्यास प्रारंभ केला तरी तो व्हिडीओ पाहण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. गत अनेक महिन्यांपासून ही सुविधा डेस्कटॉपसाठी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. याची काही युजर्सच्या माध्यमातून चाचणी सुरू असल्याचेही दिसून आले होते. या पार्श्‍वभूमिवर, आता हे फिचर संगणकावरून युट्युबचा वापर करणार्‍या युजर्सला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत ९टू५ गुगल या संकेतस्थळाने एका वृत्ताच्या माध्यमातून सविस्तर माहिती प्रदान केली आहे.

या वृत्तानुसार आता संगणक वापरणार्‍यांनाही मिनी प्लेअरची सुविधा देण्यात आलेली आहे. अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास या फिचरच्या माध्यमातून युजर्सला आता पिक्चर-इन-पिक्चरची सुविधा मिळणार आहे. म्हणजे युजर एखादा व्हिडीओ पाहतांना युट्युबवर अन्य बाबी सर्च करत असला तरी बाजूला एका लहान विंडोमध्ये त्याला आधीपासून सुरू असणारा व्हिडीओ दिसणार आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे तो अन्य संकेतस्थळावर सर्फींग करत असला तरी एका बाजूला त्याला संबंधीत व्हिडीओ दिसेल. या व्हिडीओला प्ले, पॉज आदींसह बंद करण्याची सुविधादेखील देण्यात येणार आहे. म्हणजेच त्या व्हिडीओ प्लेअरचे सर्व प्रकारच्या नियंत्रणाची सुविधादेखील यात देण्यात आलेली आहे. हे फिचर विंडोज आणि मॅक प्रणालीच्या युजर्सला देण्यात येणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने याला अपडेटच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याचेही यात सांगण्यात आलेले आहे. अद्याप युट्युबतर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, अनेक युजर्सला हे फिचर दिसू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here