युट्युबने आता विविध चॅनल्सच्या निर्मात्यांसाठी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची सुविधा प्रदान केली आहे. या माध्यमातून चॅनल्सच्या उत्पादनाचा नवीन मार्ग शोधण्यात आला आहे.
सध्या ऑनलाईन व्हिडीओच्या क्षेत्रात तुंबळ लढाई सुरू आहे. युट्युबच्या या क्षेत्रातील मिरासदारीला फेसबुकने कधीपासूनच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता इन्स्टाग्रामही या स्पर्धेत उतरले आहे. अलीकडेच इन्स्टाग्रामने एक तासांच्या लांबीचे व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा प्रदान केली असून यासाठी स्वतंत्र अॅपदेखील सादर केले आहे. याला युट्युबने लागलीच जोरदार प्रत्युत्तरदेखील दिले आहे. युट्युबने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबत घोषणा केली आहे. यात तीन महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात आता कोणत्याही चॅनलच्या क्रियेटर्ससाठी मासिक वर्गणीची सुविधा देण्यात आली आहे. कुणीही युजर दरमहा ४.९९ डॉलर्स भरून एखाद्या चॅनलचे सदस्यत्व घेऊ शकणार आहे. यात त्याला अन्य सभासदांना नसणार्या काही प्रिमीयम बाबींचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये स्पेशल इमोजी, प्रिमीयम कंटेंट आदींचा समावेश असणार आहे. एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असणार्या चॅनल्ससाठी हे फिचर कार्यान्वित करण्यात आले आहे.
युट्युबने मरचंडाईज हे दुसरे फिचरदेखील दिले आहे. याच्या अंतर्गत कोणत्याही चॅनलवरून विविध प्रॉडक्टची थेट विक्री करण्याची संधी प्रदान करण्यात आली आहे. यात विविध प्रॉडक्टची विक्रीदेखील यातून करता येणार आहे हे विशेष. ही सुविधा सध्या तरी अमेरिकेतील चॅनल्सच्या संचालकांसाठी देण्यात आली असून यासाठी किमान १० हजार सबस्क्रायबरची अट टाकण्यात आली आहे. तर युट्युबने यासोबत प्रिमीयर्स हे फिचरदेखील सादर केले आहे. यामध्ये आधीपासून रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओला लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून दर्शविण्याची सुविधा देण्यात येणार आहे.