अमेझॉनने अमेझॉनट्युब या नावाने व्हिडीओ सेवा सुरू करण्याचे संकेत दिले असून या माध्यमातून ही कंपनी गुगलच्या युट्युबला तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे.
गुगल आणि अमेझॉन या कंपन्यांमध्ये अलीकडच्या काळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुगलने आपल्या युट्युब या अॅपला १ जानेवारीपासून अमेझॉन इको शो या डिस्प्लेयुक्त स्मार्ट स्पीकर आणि फायर टीव्हीवरून हटविले आहे. यावर मार्ग काढत अमेझॉनने आपल्या फायर टिव्हीवर फायरफॉक्स ब्राऊजरच्या माध्यमातून युट्युब दिसण्याची तजवीज केली असता गुगलने यातही अडथळा निर्माण केला आहे. अमेझॉन हे जगातील आघाडीचे शॉपींग पोर्टल आहे. यावरून गुगल कंपनीचे क्रोमकास्ट तसेच गुगल होम आदींसारखे प्रॉडक्ट विकण्यास अमेझॉन टाळाटाळ करत आहे. कारण यांची अमेझॉनच्या उत्पादनांशी थेट स्पर्धा आहे. यामुळे गुगलने युट्युब हटविण्याच्या माध्यमातून अमेझॉनची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. यामुळे युट्युबच्या मिरासदारीला आव्हान देण्यासाठी अमेझॉनने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. यानुसार अमेझॉनट्युब ही सेवा सुरू करण्याच्या हालचालीस प्रारंभ करण्यात आला आहे. काही निवडक डेव्हलपर्सच्या माध्यमातून याची चाचणीदेखील घेतली जात आहे. तर यासोबत ओपनट्युब या नावानेही नवीन सेवा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.