लवकरच येणार ड्रोन धोरण: जाणून घ्या नियमावली

0

भारताचे ड्रोन उड्डाणाबाबतचे बहुप्रतिक्षित धोरण प्रसिध्द होणार असून यात हौशी छायाचित्रकारांपासून ते याच्या विविध व्यवसायातील उपयोगाबाबत नियमावली असेल.

सध्या अगदी गाव पातळीपर्यंत छायाचित्रणासाठी ड्रोन वापरले जात आहेत. तथापि, आजवर कायद्याच्या दृष्टीने विचार केला असता ड्रोन उड्डाणाला परवानगीच नव्हती. कारण याबाबत सरकारने धोरणच आखले नव्हते. तथापि, महिनाभरात ड्रोन उड्डाणाबाबत नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनतर्फे देण्यात आली. या धोरणाचा मसुदादेखील प्रसिध्द करण्यात आला आहे. यात आवश्यक ते बदल करून महिनाभरात ड्रोन धोरण जाहीर होणार आहे.
दरम्यान, ड्रोन उड्डाणाबाबत जारी करण्यात आलेल्या मसुद्यानुसार आगामी धोरणात काय असेल याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानुसार देशातील ड्रोन वापरला चार प्रकारांमध्ये विभाजीत करण्यात येणार आहे. हे चार प्रकार ड्रोनच्या वजनावरून ठरविण्यात येणार आहे. यातील पहिल्या प्रकारात २५० ग्रॅमपर्यंत वजन असणारे ड्रोन असतील. याला नॅनो असे नाव देण्यात आले असून हे मॉडेल ५० फुटांपर्यंत उडविण्याची परवानगी असेल. हे ड्रोन वापरण्यासाठी शासनाकडे नोंदणी करावी लागेल. तसेच यातील एकंदरीत लोड २ किलोग्रॅमपेक्षा जास्त झाल्यास संबंधीत सुरक्षा प्रणालींकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. २५० ग्रॅम ते २ किलोग्रॅम वजन असणारे ड्रोन हे मायक्रो या वर्गवारीत येतील. २ ते २५ किलोग्रॅमच्या दरम्यान वजन असणारे मॉडेल्स मिनी या प्रकारात असतील. २५ ते १५० किलोग्रॅम वजनाचे ड्रोन हे स्मॉल तर १५० किलोग्रॅमच्या वर असणारे लार्ज या प्रकारात असतील. नवीन नियमानुसार देशात विकल्या जाणार्‍या प्रत्येक ड्रोन मॉडेलला युनिक आयडेंटिफिकेशन प्रदान केला जाईल. तर मिनी या वर्गवारीतील ड्रोन चालविणार्‍यांना रिमोट पायलट प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य असेल. संसदेसह देशातील महत्वाच्या वास्तू, संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असणारी ठिकाणी, आंतरराष्ट्रीय सीमारेषा तसेच कोणत्याही विमानतळाच्या परिसरात ड्रोन उड्डाण करणे बेकायदेशीर ठरविण्यात येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे धावत्या अवस्थेत अर्थात कोणत्याही वाहनावरून, बोटीतून अथवा अन्य वाहनांमधून ड्रोन उडविणे बेकायदेशीर असेल.

छायाचित्रणासह ड्रोन हे विविध कामांसाठी वापरले जाते. यात प्रामुख्याने आपत्कालीन स्थितीसह ई-कॉमर्स कंपन्यांना डिलीव्हरीसाठी याचा उपयोग होणार आहे. विशेषत: अमेझॉन कंपनीने ड्रोन डिलीव्हरीचे पेटंटदेखील घेतले असून काही ठिकाणी याची प्रयोगात्मक अवस्थेत चाचणी पूर्ण केली आहे. भारतात आजवर ड्रोन धोरण नसल्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग शक्य नव्हते. मात्र लवकरच हे धोरण प्रसिध्द झाल्यानंतर ड्रोनचा विविध क्षेत्रांमधील वापर वाढणार यात शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here