विंडोज फोन जाणार काळाच्या पडद्याआड

0

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या विंडोज १० या प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोन्सचे उत्पादन थांबवण्याचे जाहीर केले असून यामुळे विंडोज फोन निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगात सध्या अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीम्सने बाजारपेठेचा मुख्य हिस्सा व्यापलेला आहे. तर विंडोज प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोन्सचा वाटा अवघा १.३ टक्के इतका आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी हाच आकडा २.४ टक्के होता. अर्थात एका वर्षात विंडोज फोनच्या लोकप्रियतेत प्रचंड घसरण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मायक्रोसॉफ्टने विंडोज प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोनचे उत्पादन थांबवण्याचे संकेत दिले आहेत. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज स्मार्टफोन विभागाचे कार्पोरेट व्हाईस प्रेसिडेंट जोए बेलफिओर यांनी अनेक ट्विटच्या माध्यमातून याला दुजोरा दिला आहे. यात त्यांनी विंडोज १० प्रणालीवरील स्मार्टफोनचे उत्पादन थांबवत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले असून विद्यमान स्मार्टफोनधारकांना विविधांगी सुरक्षा प्रदान करण्याची ग्वाही दिली आहे. तर विंडोज फोनधारकांना अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर शिफ्ट करण्यासाठी आपली कंपनी मदत करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

जागतिक बाजारपेठेत सध्या विंडोज १० या प्रणालीवर चालणारे एचपी एलीट एक्स३, मायक्रोसॉफ्ट लुमिया ९५० एक्सएल, मायक्रोसॉफ्ट लुमिया ९५० आणि नोकिया लुमिया ९३० हे प्रमुख मॉडेल्स आहेत. एचपी कंपनीने अलीकडेच विंडोज १० प्रणालीवरील स्मार्टफोनचे उत्पादन थांबविण्याचे जाहीर केले होते. तर मायक्रोसॉफ्टच्या ताज्या घोषणेमुळे विंडोज फोन इतिहासजमा होणार असल्यावर स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपुर्वीच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस् यांनी विंडोज स्मार्टफोनऐवजी अँड्रॉइड स्मार्टफोन प्रणालीचा वापर करण्याचे जाहीर केल्यामुळे टेकवर्ल्डमध्ये चर्चेला उधाण आले होते. यातच आता ताज्या घोषणेमुळे विंडोज फोनच्या भविष्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here