व्हाटसअ‍ॅपच्या पेमेंट प्रणालीची लवकरच होणार घोषणा

0

गेल्या अनेक दिवसांपासून प्रयोगात्मक अवस्थेत असणारी व्हाटसअ‍ॅपवरील पेमेंट प्रणाली आता सर्व भारतीय युजर्सला वापरता येणार असून याबाबत लवकरच घोषणा होणार आहे.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या भारतातील युजर्ससाठी पेमेंट प्रणाली वापरण्याची सुविधा बीटा अवस्थेत प्रदान केली होती. आता मात्र हे फिचर लवकरच सर्वांना वापरता येणार आहे. यासाठी व्हाटसअ‍ॅपने एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सीस या तीन बँकांशी सहकार्याचा करार केला आहे. तर लवकरच स्टेट बँकेशीही करार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्हाटसअ‍ॅपने आधी प्रयोगात्मक अवस्थेत दिलेल्या फिचरचा भारतातील सुमारे १० लाख युजर्सनी वापर केला असून त्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे यात काही बदल करण्यात येणार आहेत. यानंतर ही पेमेंट सिस्टीम अधिकृतपणे लाँच होणार असल्याचे वृत्त आहे.

व्हाटसअ‍ॅपच्या पेमेंट प्रणालीमध्ये भारत सरकारच्या युपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) प्रणालीवर आधारित देवाण-घेवाण करणे शक्य आहे. यासाठी डॉक्युमेंट, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट यांच्यासोबत पेमेंट या नावाने नवीन पर्याय देण्यात येणार आहे. यावर क्लिक केल्यावर संबंधीत युजरच्या युपीआय अकाऊंट उघडते. कुणाचे युपीआयवर अकाऊंट नसल्यास त्याला याबाबत सूचित करण्यात येते. एका का युपीआयचे अकाऊंट संलग्न केले की, कुणीही यावरून पैशांची देवाण-घेवाण करू शकतो. पहिल्यांदा ही प्रणाली अँड्रॉइड युजर्ससाठी सादर होऊ शकते.

व्हाटसअ‍ॅपच्या डिजीटल पेमेंट प्रणालीतील आगामनामुळे या क्षेत्रातील स्पर्धा अजून तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत. या क्षेत्रात पेटीएम आघाडीवर असून गुगल तेजदेखील हळूहळू लोकप्रिय होत आहे. मात्र भारतात व्हाटसअ‍ॅपचे तब्बल २० कोटींपेक्षा जास्त युजर्स असून यामुळे या क्षेत्रात हे मॅसेंजर तीव्र गतीने आगेकुच करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here