व्हाटसअॅपवर विशिष्ट शब्दांनी युक्त असणारा मॅसेज पाठविल्यास अॅप क्रॅश होत असल्याचे उघड झाले असून याबाबत काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
व्हाटसअॅप क्रॅश करण्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जात असल्याचे आधी देखील दिसून आले होते. तेव्हा व्हाटसअॅपने सिक्युरिटी पॅचच्या माध्यमातून याला दुरूस्त केले होते. तथापि, आता हा पुन्हा प्रकार सुरू असल्याचा माहितीवजा इशारा व्हाटसअॅपच्या आगामी फिचर्सबाबत अचूक भाकिते करणार्या WaBetaInfo या संकेतस्थळाने दिला आहे.
या माहितीनुसार ब्राझीलमध्ये गेल्या काही दिवसांपासून विशिष्ट शब्द आणि इमोजींचा वापर असणारे मॅसेज पाठवण्यात येत आहेत. कोणत्याही युजरने हा मॅसेज ओपन केल्यास त्याचे व्हाटसअॅप अॅप्लीकेशन हे तातडीने क्रॅश होते. अॅप तात्काळ बंद होत असल्याने युजरला नेमके काय झाले ते कळत नसल्याने अनेक युजर्सचा यामुळे गोंधळ उडत आहे. आता हाच प्रकार ब्राझीलमधून अन्य राष्ट्रांमध्ये गेल्याचे दिसून आले आहे.
WaBetaInfo च्या माहितीनुसार विशिष्ट शब्दांनी युक्त असणारे मॅसेज पाठविणे व त्यातून व्हाटसअॅप क्रॅश करणे ही बाब तशी फारशी गंभीर नाही. तथापि, यापासून बचाव करण्यासाठी युजर्सनी व्हाटसअॅपची ताजी आवृत्ती अपडेट करणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे व्हाटसअॅपनेही आपल्या ताज्या आवृत्तीत याला सिक्युरिटी पॅचच्या माध्यमातून दुरूस्त केले आहे.