सर्व युजर्ससाठी फेसबुक वॉचची सुविधा उपलब्ध

0
facebook watch, फेसबुक वॉच

फेसबुकने आपले मर्यादीत प्रमाणात सादर केलेले वॉच हे फिचर आता जगातील सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकने २०१७ साली वॉच हे फिचर सादर करण्याची घोषणा केली होती. पहिल्यांदा याला प्रयोगात्मक स्थितीत उपलब्ध करण्यात आले होते. तर काही महिन्यांमध्येच अमेरिकेतील युजर्सला ही सुविधा प्रदान करण्यात आली होती. आता जगभरातील युजर्सला हे फिचर अपडेटच्या स्वरूपात प्रदान करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबत सविस्तर विवेचन केले आहे. ही एक प्रकारची व्हिडीओ ऑन डिमांड सेवा असून फेसबुकवरील विद्यमान व्हिडीओ कंटेंटपेक्षा याला थोड्या वेगळ्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. यात ओरिजनल व्हिडीओ (उदा. दूरचित्रवाणी कार्यक्रम, विविध स्पर्धांचे लाईव्ह शोज आदी.) एकाच ठिकाणी पहावयास मिळतील. या सोशल साईटवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र मूळ स्त्रोत ज्ञात नसणार्‍या व्हिडीओजला यावर स्थान दिले जाणार नसल्याचे फेसबुकने आधीच नमूद केले आहे. विशेष बाब म्हणजे यात इंग्रजीच नव्हे तर हिंदी व मराठीसह अन्य भारतीय भाषांमधील व्हिडीओजही सादर करण्यात येणार आहेत.

फेसबुकच्या वॉच या विभागात काही उपविभाग दिलेले आहेत. यात मोस्ट टॉक्ड अबाऊट या उपविभागात ज्या व्हिडीओजवर सर्वाधीक चर्चा सुरू असेल त्यांची लिस्टींग असेल. व्हाट मेकिंग पीपल लॉफ यात कॉमेडी व्हिडीओ शोजचा अंतर्भाव असेल. तर व्हाटस फ्रेंडस आर वॉचिंग या विभागात संबंधीत युजरच्या मित्रांच्या यादीतील वापरकर्ते पाहत असणार्या व्हिडीओजला दर्शविण्यात येणार आहे. यातील प्रत्येक शोमध्ये प्रतिक्रिया देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात वॉचलिस्टच्या माध्यमातून हव्या त्या कार्यक्रमांची लिस्टींग करण्याची सोयदेखील असेल. हा विभाग वेब, संगणक आणि स्मार्टफोन या दोन्ही प्रकारे फेसबुकचा वापर करणार्‍यांना मिळणार आहे. अर्थात हे फिचर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येणार आहे.

फेसबुक आणि गुगलची मालकी असणार्‍या युट्युबमध्ये व्हिडीओ शेअरींगच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरू आहे. मध्यंतरी फेसबुकने थोडी आगेकूच केली होती. मात्र आता युट्युब सुसाट वेगाने लोकप्रिय होत असल्यामुळे फेसबुकची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे वॉच या फिचरच्या माध्यमातून व्हिडीओ आणि याच्याशी संबंधीत जाहिरातींच्या स्त्रोतावर फेसबुकचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here