सीबीएस प्रणालीयुक्त सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ दाखल

0

सुझुकी कंपनीने आपल्या अ‍ॅक्सेस १२५ या स्कूटरला आता सीबीएस (कंबाईन्ड ब्रेक सिस्टीम) या प्रणालीसह बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

१ एप्रिल २०१९ पासून देशात विकल्या जाणार्‍या १२५ सीसी क्षमतेच्या आतील सर्व दुचाकींमध्ये सीबीएस प्रणाली अनिवार्य करण्यात आलेली आहे. यामुळे आता विविध दुचाकी उत्पादक याच प्रकारातील मॉडेल्सला बाजारात उतारण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने सुझुकी मोटारसायकल कंपनीने आपल्या अ‍ॅक्सेस १२५ या मॉडेलमध्ये या प्रणालीचा समावेश करून बाजारपेठेत सादर केली आहे. सीबीएस प्रणालीमध्ये एका ब्रेकच्या (डाव्या बाजूला असणारे ब्रेक लिव्हर) मदतीने पुढील व मागील हे दोन्ही ब्रेक समान पध्दतीत दाबले जातात. यामुळे अचानक ब्रेक लावतांना गाडी स्लीप होण्याचा धोका टळतो. तसेच यामुळे मागील ब्रेक अचानक ब्लॉक होण्याची शक्यतादेखील कमी होते. यामुळे ही प्रणाली अतिशय उपयुक्त मानली जात आहे. सुझुकी अ‍ॅक्सेस १२५च्या डिस्क व्हेरियंटमध्येच ही नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून याचे मूल्य ५८,९८० रूपये आहे. सहा अतिशय आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये याला उपलब्ध करण्यात आले आहे.

सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ सीबीएस या मॉडेलमध्ये मूळ आवृत्तीनुसारच १२४.९ सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले असून याला अ‍ॅटोमॅटीक गिअर्सशी संलग्न करण्यात आले आहे. यातील उर्वरित फिचर्स हे मूळ आवृत्तीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. ही स्कूटर होंडा अ‍ॅक्टीव्हा १२५, टिव्हीएस एनटॉर्क १२५, अप्रिलिया एसआर१२५ आणि होंडा ग्रेझिया या मॉडेल्सला आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुझुकी कंपनीने अ‍ॅक्सेस १२५च्या विशेष आवृत्तीसाठी मेटॅलिक सोनीक सिल्व्हर या रंगाचा नवीन पर्यायदेखील सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here