सॅमसंगचा ६४ मेगापिक्सल्स कॅमेरायुक्त स्मार्टफोन

  0

  सॅमसंगने तब्बल ६४ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याने सज्ज असणारा गॅलेक्सी ए७१ हा स्मार्टफोन आज भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

  गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंग गॅलेक्सी ए७१ या मॉडेलबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य २९,९९९ रूपये असून याला प्रिझम क्रश सिल्व्हर, ब्ल्यू आणि ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. २४ फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. यात बरेच सरस फिचर्स असले तरी यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यातील अतिशय दर्जेदार कॅमेरा होय. याच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा तब्बल ६४ मेगापिक्सल्सचा असून याला १२ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड लेन्सयुक्त कॅमेरा, ५ मेगापिक्सल्सचे डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सल्सचे मॅक्रो लेन्स या अन्य तीन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. याच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा आणि व्हिडीओ चित्रीकरण करता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. या फ्रंट कॅमेर्‍यात स्लो-मो सेल्फी हे वैशिष्ट्यपूर्ण फिचर प्रदान करण्यात आले आहे. फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ४५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा वन युआय २.० हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

  सॅमसंग गॅलेक्सी ए७१ या मॉडेलमध्ये ६.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२४०० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा इन्फीनिटी ओ या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७३० हा वेगवान प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here