सॅमसंगने टु-इन-वन या प्रकारातील गॅलेक्सी बुक २ हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणारे टु-इन-वन या प्रकारातील मॉडेल्स लोकप्रिय झालेले आहेत. या अनुषंगाने सॅमसंग गॅलेक्सी बुक २ हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. मायक्रोमॅक्सने सादर केलेल्या सरफेस प्रो मॉडेलला या माध्यमातून तगडे आव्हान उभे करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सॅमसंग गॅलेक्सी बुक २ हे विंडोज १० एस मोड या प्रणालीवर चालणारे आहे. यामुळे विंडोजशी संलग्न असणारे सर्व प्रॉडक्टीव्हिटी टुल्स यात वापरता येणार आहेत. यात १२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २१६० माय १४४० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५० हा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ४ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके देण्यात आलेले आहे. यासोबत एस पेन या स्टायलस पेनदेखील देण्यात आलेला आहे. याच्या मदतीने या मॉडेलच्या डिस्प्लेवर कुणीही रेखाटन करू शकतो. यासोबत यावर नोटस्देखील घेता येणार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी बुक २ या मॉडेलमध्ये मागील बाजूस ८ तर समोर ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यामध्ये युएसबी टाईप-सी या प्रकारातील दोन पोर्ट देण्यात आलेले आहेत. यात मायक्रो-एसडी कार्ड स्लॉटदेखील प्रदान करण्यात आला आहे. यातील ध्वनी प्रणाली ही डॉल्बी अॅटमॉसने युक्त असणारी आहे. यामुळे याच्या मदतीने अतिशय सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. यात मल्टी-वर्क डे या प्रकारातील बॅटरी दिलेली आहे. यामुळे ही एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० तासांचा बॅकअप देत असल्याचा सॅमसंग कंपनीचा दावा आहे. याला फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाचा सपोर्टदेखील दिलेली आहे. हे मॉडेल पहिल्यांदा अमेरिकेत सादर करण्यात आले असून लवकरच याला भारतातही लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.