आता एयरटेल देखील व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा सुरू करणार

0

‘वर्क फ्रॉम होम’ मुळे सर्वच कंपन्या आता व्हिडीओ कॉन्फरन्सींग सेवांकडे वळल्या असून यात भारती एयरटेलचीही भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे जगभरात ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. यातील सर्वात आवश्यक असणारे टुल हे अर्थातच व्हिडीओ कॉन्फरन्सींग सेवा होय. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून झूम अ‍ॅपच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हे पाहून गुगलने आपल्या गुगल मीट आणि ड्युओ या सेवांमध्ये नवनवीन फिचर्स प्रदान केले आहेत. याच्या पाठोपाठ अलीकडेच रिलायन्सच्या जिओने जिओ मीट या नावाने झूमला टक्कर देऊ शकेल अशी नवीन व्हिडीओ कॉन्फरन्सींग सेवा सादर केली आहे. अर्थात, या क्षेत्रातील स्पर्धा आता चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आता भारती एयरटेल ही कंपनी देखील या स्पर्धेत उडी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सेल्युलर सेवांमधील देशातील आघाडीची कंपनी म्हणून भारती एयरटेल ख्यात आहे. ही कंपनी स्वत:ची व्हिडीओ कॉन्फरन्सींग सेवा सुरू करणार असल्याची विश्‍वसनीय माहिती समोर आली आहे. यानुसार झूम आणि जिओ मीटच्या तोडीस तोड असणारी सेवा एयरटेल युजर्सला सादर करणार आहे. यात झूम व जिओमीटमधील बहुतांश फिचर्स असतील अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात युजर्सच्या सुरक्षेला जास्त प्राधान्य दिलेले असेल. एयरटेलचे सर्व्हर हे भारतातील असून या माध्यमातून त्यांची माहिती सुरक्षित असेल यावर ही कंपनी भर देऊ शकते. याच्या जोडीला युजर्सची गोपनीय माहिती ही सुरक्षित ठेवण्यावरही भर दिला जाणार असल्याचे वृत्त आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये एयरटेलने आगमन केल्यास या क्षेत्रातील स्पर्धा अजून चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here