हुआवे कंपनीचे स्मार्टफोन वापरणार्‍यांना इशारा

0

हुआवेला अमेरिकेत बंदी घातल्यानंतर अन्य बर्‍याच कंपन्यांनी यासोबत आपल्या सेवा बंद करण्याचे जाहीर केल्याचा फटका युजर्सला बसणार आहे.

जगभरात अग्रगण्य असणार्‍या हुआवे या चिनी कंपनीला अलीकडेच अमेरिकन सरकारने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. अर्थात, अमेरिकन बाजारपेठेत हुआवे स्मार्टफोन्सच्या विक्रीला तातडीने बंद करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने पेटंटच्या नियमांचे उल्लंघन आणि युजर्सची गोपनीय माहिती चीनी सरकारकडे सुपूर्द करण्याची कारणे प्रमुख मानली जातात. यामुळे हुआवे या जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या स्मार्टफोन उत्पादक कंपनीला जबर धक्का बसला. यानंतर अनेक देशांमध्ये याच प्रकारची बंदी लादण्यात आली असून यासोबत अनेक कंपन्यांनीही हुआवेसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने गुगलने त्या कंपनीच्या स्मार्टफोनवर आपल्या सेवा तसेच अँड्रॉइड ही ऑपरेटींग सिस्टीम न वापरण्याचे घोषीत केले आहे. यानंतर आता एसडी कार्ड असोसिएशन या जागतिक पातळीवरील संघटनेने हुआवेसोबतची भागिदारी संपुष्टात आणल्याचे जाहीर करून अजून एक दणका दिला आहे.

एसडी कार्ड असोसिएशनच्या या निर्णयाचा हुआवेला मोठा फटका बसणार आहे. यामुळे या कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्समध्ये मायक्रो-एसडी कार्ड वापरता येणार नाहीत. जवळपास प्रत्येक युजर या प्रकारातील कार्ड वापरत असतो. किंबहुना मायक्रो-एसडी कार्ड हे आपल्या डिजीटल आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेले आहेत. यामुळे याच्याच वापरावर बंदी येणार असल्यामुळे युजर्सला मोठा फटका बसेल हे निश्‍चित. यातच आता वाय-फाय अलायन्सनेही या कंपनीवर तात्पुरती बंदी घालण्याची घोषणा केली आहे. अर्थात, यामुळे हुआवेसमोरील अडचणींमध्ये वाढ झालेली आहे.

हुआवे कंपनीच्या भारतातील विद्यमान ग्राहकांना याचा फटका बसणार नाही. अर्थात, बाजारपेठेत सध्या उपलब्ध असणार्‍या सर्व मॉडेल्समध्ये गुगलच्या सेवा, मायक्रो-एसडी कार्ड सपोर्ट आदी फिचर्स राहतील. तथापि, आगामी मॉडेल्समध्ये या सुविधा मिळणार नाहीत. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी हुआवेतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम, अ‍ॅप्स स्टोअर, एसडी कार्ड आदींना विकसित करण्याचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here