अमेझॉनचे सोशल नेटवर्क

0

अमेझॉनने स्पार्क या नावाने सोशल नेटवर्क सादर केले असून या माध्यमातून शॉपिंगला समाजमाध्यमाचा आयाम प्रदान करण्यात आला आहे.

गत काही दिवसांपासून अमेझॉन कंपनी एनीटाईम या नावाने मॅसेंजर लाँच करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, स्पार्क या सोशल नेटवर्कची घोषणा करण्यात आली. अमेझॉनच्या आयफोन अ‍ॅपचा एक भाग म्हणून हे सोशल नेटवर्क सादर करण्यात आले असून लवकरच अँड्रॉइड अ‍ॅपधारकांनाही याची सुविधा मिळणार आहे. यात समविचारी ग्राहकांना एकत्र आणण्याचे काम करण्यात येणार आहे. अर्थात याच्या जोडीला न्यूज फिडमधून थेट खरेदी करण्याची सुविधाही यात असेल. स्पार्क या सोशल नेटवर्कवर लॉगीन करतांना आपल्याला विविध इंटरेस्टमधून आपल्याला हव्या त्या आवडी-निवडीवर क्लिक करावे लागेल. यानंतर संबंधीत ग्राहकाला याच्याशी संबंधीत पोस्ट दिसतील. यावर तो ग्राहक प्रतिक्रिया देऊ शकतो. याशिवाय त्या प्रॉडक्टला खरेदी करू शकतो. अमेझॉनवर उपलब्ध असणारे विविध प्रॉडक्ट यावर शेअर करता येतील. मात्र ही सेवा अमेझॉन प्राईमचे सदस्य असणार्‍यांनाच उपलब्ध आहे. भारतीय ग्राहकांना यासाठी ४९९ रूपये प्रति-वर्ष इतकी रक्कम मोजावी लागेल.

अमेझॉन स्पार्कमध्ये प्रामुख्याने पिंटरेस्ट व इन्स्टाग्रामचा मिलाफ असून याला अमेझॉन प्राईमशी अटॅच करण्यात आले आहे. यात पिंटरेस्टप्रमाणे छायाचित्रांनी युक्त असणार्‍या पोस्ट शेअर करता येतील. याला शॉपिंगचा आयामदेखील देण्यात आला आहे. तर इन्स्टाग्रामच्या स्टोरीजप्रमाणे शेअरिंगची सुविधाही यात देण्यात आली आहे. अमेझॉन स्पार्कचा पिंटरेस्टवर काही प्रमाणात तरी फरक पडणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, ही नवीन सेवा नेमकी किती परिणामकारक ठरेल? यावर मात्र तज्ज्ञांचे एकमत नाहीय. तर फक्त प्राईम मेंबर्सला याचे सदस्य होत येत असल्याची बाबदेखील या सोशल नेटवर्कच्या लोकप्रियतेतील प्रमुख अडसर ठरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here