गुगलच्या अँड्रॉइड प्रणालीवर चालणारा टिव्हीच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून सध्या १०० पेक्षा जास्त कंपन्या याचे उत्पादन करत असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
गुगलने २०१४ सालच्या आपल्या आय/ओ या वार्षिक परिषदेत अँड्रॉइड टिव्हीची पहिल्यांदा घोषणा केली होती. आज साडेचार वर्षानंतर अँड्रॉइड टिव्हीच्या लोकप्रियतेमध्ये विलक्षण वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत अँड्रॉइड टिव्हीच्या वरिष्ट संचालिका शालिनी गोविल-पै यांनी अधिकृत माहिती जाहीर केली आहे. त्या म्हणाल्या की, अल्प कालावधीतच जगभरातील कोट्यवधी स्मार्ट टिव्हींमध्ये अँड्रॉइड टिव्ही प्रणालीचा वापर केला जात आहे. यातील निम्यांपेक्षा जास्त युजर्स हे आशिया आणि युरोपातील असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. तर १०० पेक्षा जास्त कंपन्या या प्रणालीवर आधारित उत्पादन करत असल्याचेही त्या म्हणाल्या. एटी अँड टी कंपनी यावरच आधारित टिव्ही सादर करणार असल्यामुळे २०१९ मध्ये अँड्रॉइड टिव्हीच्या लोकप्रियतेत अजून वाढ होणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
अँड्रॉईड टिव्हीवर युजर्सला गुगल प्ले स्टोअरवरून त्याला हवे असणारे अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करता येते. यात नेटफ्लिक्स, युट्युब आदींसारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांची याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्याचे मानले जात आहे.