अ‍ॅपलचा धमाका : नवनवीन सेवांची घोषणा

0

अ‍ॅपलने आता चार नवीन सेवांची घोषणा केली असून याला अधिकृतपणे जगासमोर सादर करण्यात आले आहे.

अ‍ॅपलने इटस् शो टाईम या कॅचलाईनसह २५ मार्च रोजी कार्यक्रम घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या टेकविश्‍वात कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, अ‍ॅपलने आपल्या कार्यक्रमात नाविन्यपूर्ण सेवांची घोषणा केली. यामध्ये अ‍ॅपल न्यूज प्लस, अ‍ॅपल आर्केड, अ‍ॅपल कार्ड आणि अ‍ॅपल टिव्ही प्लस या चार सर्व्हीसेसचा समावेश आहे. अ‍ॅपल न्यूज प्लस ही नावातच नमूद असल्यानुसार वृत्तविषयक सेवा आहे. याचा दर ९.९९ डॉलर्स प्रति-महिना असून याच्या वर्गणीदाराला जगभरातील विख्यात मासिके आणि वर्तमानपत्रांचा अ‍ॅक्सेस मोफत मिळणार आहे. यामध्ये फॅमिली शेअरींग प्लॅनचाही समावेश करण्यात आला आहे.

अ‍ॅपल कार्ड हे या कंपनीने सादर केलेले क्रेडीट कार्ड आहे. खरं तर आधीच अ‍ॅपल पे या सेवेच्या माध्यमातून डिजीटल पेमेंटची सेवा असतांना या कंपनीने आता स्वत:चे क्रेडीट कार्ड आणले आहे. यासाठी गोल्डमन सॅशसोबत सहकार्याचा करार करण्यात आला आहे. यामध्ये अ‍ॅपल पे आणि नॉन अ‍ॅपल पे युजर्ससाठी देवार-घेवाण करण्याची सुविधा मिळणार आहे. याच्या प्रमोशनसाठी अ‍ॅपलने विविध प्रकारच्या खरेदींवर कॅशबॅक ऑफर्स देऊ केली आहे. विशेष म्हणजे यात व्यवहारांसाठी कोणतीही अतिरिक्त आकारणी करण्यात येणार नसून व्याज दरदेखील अतिशय अल्प आहेत.

अ‍ॅपल आर्केड ही या कंपनीची क्रॉस-प्लॅटफॉर्म या प्रकारातील गेमिंग सबस्क्रीप्शन सेवा आहे. यात डिस्ने, कार्टून नेटवर्क, सेगा आदींसारख्या ख्यातप्राप्त कंपन्यांच्या १०० पेक्षा जास्त आयओएस प्रणालीसाठी असणार्‍या लोकप्रिय गेम्सचा समावेश आहे. याचे दर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. तथापि, ही सेवा एकाच वेळी १५० देशांमध्ये लाँच करण्यात येणार आहे.

अ‍ॅपल टिव्ही प्लस या सेवेच्या माध्यमातून ही कंपनी आपले ओरीजनल कंटेंट ग्राहकांना सादर करणार आहे. या कंपनीने आधीपासूनच स्टीव्हन स्पीलबर्गसह अन्य मान्यवर दिग्दर्शकांच्या मदतीने वेब सेरीज आणि डॉक्युमेंट्रीज तयार केलेल्या असून याला या मंचावर उपलब्ध करण्यात येणार आहे. याच्या जोडीला हॉलीवुडमधील सुपरहिट चित्रपटदेखील असणार आहे. तर विविध वाहिन्यादेखील यावरून ऑन डिमांड या स्वरूपात सादर करण्यात येणार आहेत. अ‍ॅपल कंपनी मे महिन्यात टिव्ही अ‍ॅप सादर करणार असून यावरूनच ही सेवा प्रदान करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

या सर्व सेवांच्या माध्यमातून अ‍ॅपलने नवनवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केल्याचे अधोरेखीत झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here