अ‍ॅपल वॉच सेरीज ५ सादर : जाणून घ्या सर्व फिचर्स

  0

  अ‍ॅपलने सेरीज ५ या मालिकेतील स्मार्टवॉच सादर केले असून यात नेहमी सुरू राहणार्‍या डिस्प्लेसह अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

  अ‍ॅपलने आपल्या वार्षिक लाँचींग कार्यक्रमात आयफोनसोबत अन्य उपकरणांचेही अनावरण केले. यात अ‍ॅपल वॉच सेरीज ५ या मालिकेचाही समावेश आहे. नावातच नमूद केल्यानुसार अ‍ॅपलचे हे पाचव्या पिढीतील स्मार्टवॉच आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे अल्वेज ऑन अर्थात नेहमी सुरू असणारा डिस्प्ले होय. हा डिस्प्ले एलटीपीओ (लो टेंपरेचर पॉलिसिलीकॉन अँड ऑक्साईड) या प्रकारातील आहे. हा डिस्प्ले सतत सुरू असला तरी तो जास्त बॅटरी वापरत नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात ऑनबोर्ड होकायंत्र प्रदान करण्यात आले असून याच्या मदतीने दिशा, अक्षांश/रेखांश आदींची तात्काळ माहिती मिळणार आहे.

  अ‍ॅपल वॉच सेरीज ५ हे स्मार्टवॉच ४० आणि ४४ मिलीमीटर आकारमानाच्या व ३२४ बाय ३९४ पिक्सल्स क्षमतेच्या डिस्प्लेमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यात अ‍ॅपलचा ड्युअल कोअर एस५ हा प्रोसेसर दिला आहे. यात तब्बल ३२ जीबी स्टोअरेज दिलेले आहे. या मॉडेलमध्ये इलेक्ट्रीकल हार्ट रेट सेन्सर दिलेले असून इसीजी अ‍ॅपला याला संलग्न करण्यात आले आहे. याच्या जोडीला दुसर्‍या पिढीतील ऑप्टीकल सेन्सर, अल्टीमीटर, अ‍ॅक्सलेरोमीटर, अँबिअंट लाईट सेन्सर, फॉल डिटेक्शन आदी फिचर्स देण्यात आले आहे. यात इमर्जन्सी कॉलींग हे विशेष फिचरदेखील दिले आहे. तर कनेक्टीव्हिटीसाठी यात ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आदी पर्याय दिलेले आहेत. यात दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १८ तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

  भारतीय बाजारपेठेत अ‍ॅपल वॉच सेरीज ५ लवकरच मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याचे जीपीएस मॉडेल ४०,९९० तर जीपीएस + सेल्युलर मॉडेल ४९,९९० रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहक याला २० सप्टेंबरपासून खरेदी करू शकतील.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here