एक्यूफिटचा एम२ फिटनेस बँड भारतात सादर

0

एक्यूफिट या स्टार्टपने भारतीय ग्राहकांसाठी एम २ हा फिटनेस बँड सादर केला असून यात फिटनेस ट्रॅकींगचे सर्व फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.

भारतात वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत आहे. या अनुषंगाने आता एक्यूफिट या स्टार्टपने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला असून एम २ हे मॉडेल लाँच केले आहे. याला उच्च दर्जाच्या सिलीकॉनपासून तयार करण्यात आले असून याचा लूक हा अतिशय आकर्षक असाच आहे. यामध्ये ०.९६ इंच आकारमानाचा, ३२० बाय ३२० पिक्सल्स क्षमतेचा आणि ओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. या उपकरणाच्या मदतीने कुणीही चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज आदींसह निद्रेचे मापन करू शकणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्या मदतीने हृदयाचे ठोके मोजता येणार असून यामध्ये रिअल टाईम हार्ट ट्रॅकींग प्रणाली दिलेली आहे. तसेच या फिटनेस बँडच्या मदतीने कुणीही आपल्या रक्तातील ऑक्सीजनच्या प्रमाणावर लक्ष ठेवू शकणार आहे.

एम२ हा फिटनेस बँड आयपी६७ या मानकानुसार तयार करण्यात आला असल्याने तो पाण्यातदेखील वापरता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. ब्ल्यु-टुथच्या मदतीने हा फिटनेस बँड स्मार्टफोनशी कनेक्ट करता येणार आहे. यासाठी कंपनीने अँड्रॉइड व आयओएस या प्रणालींवर चालणारे अ‍ॅप्लीकेशनदेखील विकसित केले आहे. याच्या डिस्प्लेवर स्मार्टफोनचे विविध नोटिफिकेशन्सदेखील पाहता येतील. तसेच यावरून कॉलदेखील करता येणार आहे. यातील ८० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १५ दिवसांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या फिटनेस बँडचे मूल्य २,४९९ रूपये असून याला फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया, स्नॅपडील आणि शॉपक्लुज या शॉपींग पोर्टल्सवरून उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here