फ्लिप कॅमेर्‍याने युक्त असुसचा झेनफोन ६ स्मार्टफोन

0

असुसने आपल्या झेनफोन ६ या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनचे अनावरण केले असून यात फ्लिप कॅमेर्‍यासह अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

असुसनच्या झेनफोन मालिकेतील विविध मॉडेल्सला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतील झेनफोन ५ या स्मार्टफोनला स्पेनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लाँच करण्यात आले. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे फ्लिप कॅमेरा होय. अर्थात, यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरा हे एकसमान आहेत. कॅमेरा जागेवर असल्यास तो रिअर कॅमेर्‍याचे काम करतो. तर फ्लिप केल्यावर यालाच फ्रंट कॅमेर्‍यात परिवर्तीत करण्यात येते. असुसने यासाठी ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान केला असून याच्या अंतर्गत ४८ आणि १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे दिलेले आहेत. एका बटनाच्या सहाय्याने हा कॅमेरा फ्लिप करता येतो. यातील मुख्य कॅमेरा हा सोनी आयएमएक्स५८६ या सेन्सरने युक्त असून यात एफ/१.७९ अपर्चर, लेसर ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅश आदी फिचर्स दिलेले आहेत. तर दुसर्‍या कॅमेर्‍यात १२५ अंशाचा वाईड अँगल व्ह्यू देण्यात आला आहे. या दोन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय उच्च दर्जाच्या प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, झेनफोन ६ या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा नॅनो एज या प्रकारातील आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १९:५:९ असा असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ६ चे संरक्षक आवरण असणार आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ हा अतिशय गतीमान असा प्रोसेसर देण्यात आला आहे. याचे ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज; ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज असे तीन पर्याय देण्यात आलेले आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा झेनयुआय ६ हा युजर इंटरफेस देण्यात आलेला आहे. तर क्विकचार्ज ४.० या तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. भारतात लवकरच हे मॉडेल लाँच करण्यात येणार असून ते फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. झेनफोन ६ या स्मार्टफोनमुळे उच्च श्रेणीतील मॉडेल्सच्या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here