ब्ल्यु-टुथ ५.१ मध्ये असतील हे नाविन्यपूर्ण फिचर्स !

0

ब्ल्यु-टुथ प्रणालीची ५.१ ही नवीन आवृत्ती लवकरच येत असून यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश असेल असे जाहीर करण्यात आले आहे.

ब्ल्यु-टुथ हा आता बहुतांश स्मार्ट उपकरणांचा अविभाज्य घटक बनला आहे. याच्या मदतीने वायरलेस पध्दतीतील अनेक फंक्शन्स पार पाडता येत असल्यामुळे याचा जगभरात विपुल प्रमाणात वापर होत आहे. खरं तर कधी काळी फक्त उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्समध्येच ब्ल्यु-टुथ वापरले जात होते. तथापि, आता अगदी स्वस्तातील स्वस्त स्मार्टफोनचाही ब्ल्यु-टुथ हा अविभाज्य घटक बनला आहे. जगभरात ब्ल्यु-टुथ तंत्रज्ञान विकसित करून याचा वापर करण्याचे काम ब्ल्यु-टुथ एसआयजी ही संस्था करते. आजवर या संस्थेने या प्रणालीचे विविध व्हर्जन्स वापरात आणले आहेत. सध्या ब्ल्यु-टुथ ५.० हे प्रचलीत आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये ब्ल्यु-टुथ ५.१ ही नवीन आवृत्ती सादर करण्यात येणार असल्याचे या संस्थेने जाहीर केले आहे. यासोबत यातील काही फिचर्सची माहितीदेखील देण्यात आली आहे.

ब्ल्यु-टुथ ५.१ ही आवृत्ती साहजीकच आधीच्या सर्व आवृत्त्यांपेक्षा गतीमान असणार आहे. अर्थात, याच्या मदतीने अधिक वेगवान पध्दतीत माहितीचे आदान-प्रदान शक्य होणार आहे. या नवीन आवृत्तीत सुरक्षेला जास्त प्राधान्य दिले आहे. यामुळे यातून होणारे संवाद वहन हे अधिक सुरक्षित असणार आहे. यात आधीपेक्षा जास्त रेंज असेल. म्हणजेच आता दूरवरूनही ब्ल्यु-टुथच्या माध्यमातून विविध फंक्शन्स वापरता येतील. मात्र यातील सर्वात लक्षवेधी फिचर हे लोकेशनशी संबंधीत असणार आहे. यात अ‍ॅडव्हान्स्ड लोकेशन सर्व्हीस तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यामुळे ब्ल्यु-टुथ सिग्नलची दिशा ही अचूकपणे ओळखता येणार असून यामुळे अर्थातच माहितीच्या वहनात अचूकपणा येऊन विस्तारीत रेंज मिळणार आहे. तसेच यामुळे ब्ल्यु-टुथ तंत्रज्ञानावर आधारित पोझिशनिंग सिस्टीम तयार होणार आहे. याच्या मदतीने अगदी एक सेंटीमीटर आकाराइतक्या क्षेत्रफळाचे अचूक लोकेशन कळणार आहे. एका अर्थाने हे मर्यादीत क्षेत्रफळालील जीपीएससारखी नेव्हिगेशन प्रणाली असेल. यामुळे आगामी काळातील कनेक्टेड उपकरणांसाठी ब्ल्यु-टुथ ५.१ हे वरदान सिध्द होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here