फेसबुकने आपल्या डेस्कटॉप आवृत्तीसाठी असणारा क्रियेटर स्टुडिओ आता अँड्रॉइड व आयओएस अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनधारकांना उपलब्ध केले आहे.
फेसबुकला डेस्कटॉपवरून वापरणार्या युजर्ससाठी २०१८ मध्ये क्रियेटर स्टुडिओ हे टुल प्रदान करण्यात आले आहे. हा एक डॅशबोर्ड असून याच्या मदतीने युजर त्याच्या पेजवर नेमके कशा प्रकारे एंगेजमेंट होत आहे याची माहिती मिळवू शकतो. याशिवाय, पोस्टला शेड्युल करणे, यावरील एंगेजमेंटची पाहणी करणे आदी बाबी क्रियेटर स्टुडिओच्या माध्यमातून करता येतात. एका अर्थाने फेसबुक पेजचे अतिशय सुक्ष्म आणि विविधांगी विश्लेषण करण्यासाठी क्रियेटर स्टुडिओ हा अतिशय उपयुक्त असाच आहे. आजवर डेस्कटॉप युजर्सलाच हे टुल उपलब्ध होते. आता मात्र याला स्मार्टफोनधारकही वापरू शकणार आहे. फेसबुकने हे टुल स्वतंत्र अॅपच्या माध्यमातून सादर केले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीचे युजर्स याला वापरू शकतील.
बर्याच फेसबुक पेजेसचे अॅडमीन हे स्मार्टफोनवरूनच आपापल्या पेजेसचे संचलन करत असतात. त्यांना आजवर क्रियेटर स्टुडिओच्या सुविधेपासून वंचित रहावे लागत होते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन याला स्मार्टफोन अॅप्सच्या माध्यमात सादर करण्यात आल्याचे मानले जात आहे.