मित्रोच्या पाठोपाठ ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप्स’ गुगल प्ले स्टोअरवरून गायब !

0

काही दिवसांमध्ये तुफान लोकप्रिय झालेले ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप्स’ आता गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले असून यामुळे गुगलच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या भारतात चीनविरोधी भावना प्रबळ झाली असून चायनीज प्रॉडक्टवर बहिष्कार घालण्याचे आवाहन जाहीरपणे केले जात आहे. यातच ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी जाहीरपणे आपल्या स्मार्टफोन्समधून चीनी अ‍ॅप्स डिलीट करण्यासह चीनी प्रॉडक्ट न वापरण्याचे आवाहन केल्यानंतर याला वेग आला आहे. भारतीय युजर्सनी टिकटॉक हे चीनी शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप डिलीट करून याला पुअर रेटींग देण्याचा सपाटा लावला. टिकटॉकच्या मदतीनेला गुगल धावून आल्याने या अ‍ॅपचे प्ले स्टोअरवरील रँकींग टिकून राहिले. यानंतर ‘वन टच अ‍ॅपल लॅब्ज’ या भारतीय कंपनीने तयार केलेले ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप्स’ हे स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन खूप लोकप्रिय झाले. नावातच नमूद असल्यानुसार हे अ‍ॅप युजरच्या स्मार्टफोनमध्ये असणार्‍या चीनी अ‍ॅप्सचा शोध घेऊन त्याला रिमूव्ह करण्याचे सुचवते. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात गुगल प्ले स्टोअरवर सादर करण्यात आलेल्या या अ‍ॅपला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला. अलीकडच्या काही दिवसांमध्ये तर गुगल प्ले स्टोअरवरील भारतातल्या सर्वाधीक लोकप्रिय अ‍ॅप्सच्या यादीत याचा समावेश असल्याचे दिसून आले.

दरम्यान, अवघ्या काही दिवसांमध्ये लोकप्रियतेच्या पायर्‍या वेगाने चढणार्‍या ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप्स’ या अ‍ॅपला गुगल प्ले स्टोअरवरून हटवून टाकल्याचे खळबळ उडाली आहे. याबाबत ‘वनटच अ‍ॅपल लॅब्ज’ आणि गुगलतर्फे अधिकृत कोणताही कारण देण्यात आलेले नाही. तथापि, टेकक्रंच या ख्यातनाम टेक पोर्टलने केलेल्या चौकशीत ‘डिसेप्टीव्ह बिहेव्हअर पॉलिसी’च्या अंतर्गत याला हटवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. हे अ‍ॅप युजरच्या स्मार्टफोन सेटींगमध्ये बदल करत असल्याने याला प्ले स्टोअरवरून हटविण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. लक्षणीय बाब म्हणजे टिकटॉकला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आलेले ‘मित्रो’ हे भारतीय अ‍ॅप देखील गुगल प्ले स्टोअरवरून काढण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here