एक्सप्रेस साईन-इन सुविधेने सज्ज असणारा डेलचा लॅपटॉप !

0

डेल कंपनीने एक्सप्रेस साईन-इन या अभिनव फिचरने सज्ज असणारा लॅपटॉप बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

संगणकादी उपकरणांच्या निर्मितीत ख्यातप्राप्त असणार्‍या डेल कंपनीने लॅटीट्युड ७४०० हा लॅपटॉप सादर केला आहे. हे मॉडेल टु-इन-वन या प्रकारातील आहे. अर्थात, याला लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरण्याची सुविधा मिळणार आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे एक्सप्रेस साईन-इन हे होय. इंटेलचे काँटेक्स्ट सेन्सींग तंत्रज्ञान आणि विंडोज हॅलोच्या मदतीने ही प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत लॅपटॉपमध्ये प्रॉक्झीमिटी सेन्सर प्रदान करण्यात आले आहे. यामुळे युजर लॅपटॉपच्या नजीक येताच हे मॉडेल आपोआप सुरू होईल. यानंतर, लॅपटॉपमधील इन्फ्रा-रेड कॅमेर्‍यांच्या मदतीने युजरचे ऑथेंटीकेशन करून त्याला लॉगीन करता येणार आहे. यानंतर युजर लॅपटॉपपासून दूर गेल्यानंतर लागलीच हे मॉडेल आपोआप स्लीप मोडमध्ये जाणार असल्याचे डेल कंपनीने नमूद केले आहे. हे या मॉडेलमधील विशेष फिचर मानले जात असून याचा ते सेलींग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, डेल लॅटीट्युड ७४०० टु-इन-वन या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा, फुल एचडी क्षमतेचा आणि १६:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या डिस्प्लेवर गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असणार आहे. यामध्ये इंटेलचे आठव्या पिढीतील व्हिस्की लेक प्रोसेसर्स देण्यात आलेले असून याला युएचडी ग्राफीक्स प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. यात १६ जीबी रॅम तर १ टेराबाईटपर्यंतच्या स्टोअरेजचे पर्याय दिलेले आहेत. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये एचडीएमआय, थंडरबोल्ट, युएसबी टाईप ए-३.१, युएसबी टाईपी-सी, मायक्रो-एसडी कार्ड रीडर आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील एका व्हेरियंटला एलईटी सपोर्टदेखील दिलेला आहे. याला ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस आदींची जोड असेल. यात स्टायलस पेनचा सपोर्टदेखील दिलेला असल्यामुळे याच्या मदतीने रेखाटन करता येणार आहे. तर हे मॉडेल विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे आहे. हा लॅपटॉप लवकरच भारतासह अन्य देशांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here