डेल कंपनीने आपला लॅटीट्युड ७४०० हा टु-इन-वन प्रकारातील लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
डेल कंपनीने या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या सीईएस-२०१९ या प्रदर्शनीत लॅटीट्युड ७४०० या मालिकेतील लॅपटॉप पहिल्यांदा प्रदर्शीत केले होते. यानंतर याला विविध देशांमध्ये लाँच करण्यात आले होते. आता हेच मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य १.३५ लाखांपासून सुरू होणारे आहे. खास प्रोफेशनल्ससाठी हे मॉडेल सादर करण्यात आल्याचे मानले जात आहे.
डेल लॅटीट्युड ७४०० या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रॉक्झीमिटी सेन्सर प्रदान करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची सुविधा असणारा हा जगातील पहिला लॅपटॉप होय. तसेच हे मॉडेल टु-इन-वन या प्रकारातील आहे. अर्थात, कि-बोर्डसह लॅपटॉप म्हणून तर कि-बोर्ड काढल्यानंतर टॅबलेट म्हणून याचा वापर करता येणार आहे. यात युजर एक्सप्रेस साईन-इन करून लॉगीन करू शकतो. यानंतर युजर लॅपटॉपजवळ आल्यानंतर त्याचा चेहरा स्कॅन करून विंडोज हॅलो कार्यान्वित होते. याशिवाय यात एक्सप्रेस कनेक्टसह वाय-फायची सुविधा असून एक्सप्रेस चार्ज ही फास्ट चार्जींग सिस्टीम प्रदान करण्यात आलेली आहे.
डेल लॅटीट्युड ७४०० या लॅपटॉपमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा व १६:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असणार आहे. यात इंटेलचे आठव्या पिढीतील अद्ययावत कोअर आय-७ प्रोसेसर देण्यात आले आहेत. याला इंटेलचे युएचडी ग्राफीक्स प्रोसेसरची जोड दिलेली आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये १६ जीबीपर्यंत रॅमचे पर्याय दिले असून ५१२ जीबीपर्यंत स्टोअरेज असणार आहे. फास्ट चार्जींगच्या तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ७८ वॅट क्षमतेची आहे.