डेल कंपनीने आपल्या इन्स्पीरॉन या मालिकेत दोन नवीन नोटबुक्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
डेल कंपनीने इन्स्पीरॉन ५४८० आणि ५५८० हे दोन नवीन नोटबुक्स भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील आहेत. डिझाईनचा विचार केला असता, याआधी बाजारपेठेत असणार्या डेल एक्सपीएस या मॉडेलनुसार याची रचना करण्यात आली आहे. यातील डिस्प्ले बेझललेस अर्थात कडा-विरहीत या प्रकारातील आहे. या दोन्ही नोटबुक्स मॉडेलमध्ये १४ आणि १५ इंच आकारमानाच्या डिस्प्लेंचे पर्याय उपलब्ध आहेत. हा डिस्प्ले फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स या क्षमतेचा आहे. यात आठव्या पिढीतील व्हिस्की लेक इंटेल कोअर प्रोसेसर देण्यात आलेले आहेत. अर्थात ग्राहकाला कोअर आय-३; आय-५ आणि आय-७ या प्रोसेसर्सचे पर्यायदेखील निवडता येणार आहेत. यात ३२ जीबी रॅमपर्यंतचे पर्याय असून स्टोअरेजसाठीही भिन्न पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये डेल सिनेमा सॉफ्टवेअर देण्यात आलेले आहे. याच्या मदतीने डिस्प्लेवर अतिशय सुस्पष्ट प्रतिमा दिसणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
इन्स्पीरॉन ५४८० आणि ५५८० या दोन नोटबुक्स मॉडेल्सचे विविध व्हेरियंटस् देशभरातील शॉपीजमधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. त्यांचे मूल्य अनुक्रमे ३६,९९० आणि ३८,९९० रूपयांपासून सुरू होणारे आहेत.