डिजेआयचा अ‍ॅक्शन कॅमेरा ग्रोप्रोला देणार तगडे आव्हान !

0

डिजेआय या ड्रोन उत्पादक कंपनीने आता अ‍ॅक्शन कॅमेरा सादर केला असून या क्षेत्रातील गोप्रो कंपनीच्या मिरासदारीला आव्हान देण्याची तयारी केली आहे.

गत अनेक दिवसांपासून डिजेआय कंपनी अ‍ॅक्शन कॅमेरा लाँच करणार असल्याची चर्चा होती. यावर शिक्कामोर्तब करत या कंपनीने ओस्मो अ‍ॅक्शन हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून नुकतेच एका कार्यक्रमात याचे अनावरण करण्यात आले आहे. हा कॅमेरा वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ आणि शॉकप्रूफ असल्यामुळे अगदी कितीही विपरीत वातावरणात सहज वापरता येणार आहे. अर्थात, रफ वापर केला तरी या कॅमेर्‍याला काहीही होणार नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये १२ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला असून याच्या मदतीने फोर-के एचडीआर क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तसेच यातून स्लो-मोशनमधील चित्रीकरणदेखील करता येणार आहे. यामध्ये इमेज ऑप्टीकल स्टॅबिलायझेशन हे फिचर दिलेले नसले तरी यातील व्हिडीओ हे स्थिर असतील असे कंपनीने नमूद केले आहे. हा कॅमेरा वजनाने अतिशय हलका व आटोपशीर आकाराचा असून तो विविध माऊंटवर अटॅच करण्याची सुविधा दिलेली आहे.

अ‍ॅक्शन ओस्मो या मॉडेलमध्ये दोन डिस्प्ले दिलेले आहेत. याच्या मदतीने कॅमेर्‍याच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येणार आहे. तर समोरील डिस्प्लेच्या मदतीने कुणीही सेल्फी प्रतिमा वा व्हिडीओ घेऊ शकतो. अर्थात यातील ड्युअल डिस्प्ले हे फिचर युजर्सच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. या कॅमेर्‍याचे मूल्य ३४९ डॉलर्स असून याच्या नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. गोप्रो कंपनीने गत वर्षी बाजारपेठेत लाँच केलेल्या हिरो ब्लॅक ७ या मॉडेलला ओस्मो अ‍ॅक्शन कॅमेरा तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पहा : डिजेआय ओस्मो अ‍ॅक्शन कॅमेर्‍याची माहिती देणारे व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here