डिजेआयचे मॅविक एयर-२ ड्रोन : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

डिजेआय कंपनीने आपले मॅविक एयर-२ हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत लाँच केले असून यात किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून डिजेआय कंपनी मॅविक एयर या मॉडेलची पुढील आवृत्ती लाँच करणार असल्याची चर्चा सुरू होती. याचे अनेक लीक्सदेखील समोर आले होते. या पार्श्‍वभूमिवर, आता मॅविक एयर-२ या नावाने हे मॉडेल बाजारात अधिकृतपणे लाँच करण्यात आले आहे. यात अनेक सरस फिचर्स आहेत. यात प्रामुख्याने वाढीव म्हणजेच ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ही बॅटरी जलद गतीने चार्ज होऊन सुमारे ३४ मिनिटांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. ड्रोनमध्ये बॅटरी हा महत्वाचा घटक असल्याने जंबो बॅटरी हे मॅविक एयर-२ मॉडेलचे बलस्थान ठरू शकते. यात वाय-फाय ऐवजी डिजेआय कंपनीनेच विकसित केलेल्या ऑक्यु-सेन्स २.० या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. याची रेंज ही सुमारे १० किलोमीटर असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याला अतिशय दर्जेदार व वापरण्यास सोपे असणार्‍या रिमोट कंट्रोलची जोड देण्यात आली असून यावर या ड्रोनचे परिपूर्ण पध्दतीत नियंत्रण करता येते. यात चित्रीकरणाचा प्रिव्ह्यू पाहण्यासाठी स्मार्टफोन अटॅच करण्याची सुविधा दिलेली आहे.

मॅविक एयर-२ या मॉडेलमध्ये अधिकतम ४८ मेगापिक्सल्स क्षमतेने प्रतिमा काढता येणार आहे. तर यात ६० फ्रेम्स प्रति सेकंद इतक्या गतीने अल्ट्रा हाय डेफीनेशन म्हणजेच ३८४० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेने व्हिडीओ चित्रीकरण करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या कॅमेर्‍यात स्मार्ट फोटो, एचडीआर, एचडीआर पॅनोरामा, सीन रिकग्नीशन आणि हायपर लाईट या फिचर्सचा समावेश आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या ड्रोनच्या मदतीने तब्बल ८-के क्षमतेचे टाईम-लॅप्स या प्रकारातील चित्रीकरण करता येणार आहे. यात सुरक्षेला प्राधान्य दिलेले आहे. या अनुषंगाने ऑबस्टॅकल सेन्सर दिलेले असून याच्या मदतीने ड्रोनची टक्कर टळणार आहे. तर याच्या खालील बाजूस असणार्‍या सेन्सरमुळे कमी प्रकाशातही हे मॉडेल सहजपणे लँड करू शकणार आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा हे वजनाने थोडे जास्त असले तरी याची डिझाईन ही अतिशय आकर्षक असून ते सहजपणे फोल्ड करता येणार आहे. यातील पाते हे अधिक वेगाने फिरणारे असून ते तुलनेत कमी आवाज करत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

मॅविक एयर-२ या मॉडेलचे मूल्य ७९९ डॉलर्स असून याची अगावू नोंदणी सुरू झालेली आहे. पहिल्यांदा हे मॉडेल अमेरिकेत मिळणार असून नंतर जगातील अन्य देशांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती डिजेआयने दिली आहे.

खालील व्हिडीओत पहा : मॅविक एयर-२ मॉडेलच्या फिचर्सची माहिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here