विंडोज ७ प्रणाली काळाच्या पडद्याआड

0

मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज ७ या ऑपरेटींग सिस्टीमचा सपोर्ट थांबविला असल्याने ही प्रणाली आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

मायक्रोसॉफ्टने आपले पूर्ण लक्ष विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर लावल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने आधीच विंडोज व्हिस्टा या प्रणालीचा सपोर्ट काढण्यात आला होता. यानंतर विंडोज ७ ला विराम देण्याची तयारी सुध्दा करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वीच याबाबत सूचना देण्यात आली होती. यानंतर या प्रणालीचे कोणतेही अपडेट आले नसले तरी सिक्युरिटी पॅचअप करण्यात आले होते. दरम्यान, १४ जानेवारी पासून या प्रणालीचा पूर्णपणे सपोर्ट काढण्यात आला आहे. यामुळे आता या ऑपरेटींग सिस्टीमचे सिक्युरिटी पॅचदेखील सादर करण्यात येणार नसल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. अर्थात, आता विंडोज ७ ही ऑपरेटींग सिस्टीम अधिकृतपणे बंद झालेली आहे. आधीच ही प्रणाली वापरत असणारे युजर्स याला भविष्यातही वापरू शकतील. तथापि, यात सुरक्षेची हमी मिळणार नसल्याने युजर्सची माहिती असुरक्षित होणार असल्याची बाब निश्‍चित आहे. नेमक्या याच बाबीमुळे मायक्रोसॉफ्टने संबंधीत सर्व युजर्सनी विंडोज १० प्रणालीवर शिफ्ट व्हावे असे सुचविले आहे.

मायक्रोसॉफ्टने २०१० साली विंडोज ७ या ऑपरेटींग सिस्टीमला सादर केले होते. याच्या सोबत ऑफीस २०१० देखील लाँच करण्यात आले होते. या प्रणालीला जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली होती. तथापि, याचीच पुढील आवृत्ती ही विंडोज १० च्या माध्यमातून सादर करण्यात आल्यानंतर विंडोज ७ ची लोकप्रियता घसरणीला लागली होती. आता कंपनीनेच याचा सपोर्ट काढून घेतल्याने ही ऑपरेटींग सिस्टीम खर्‍या अर्थाने काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here