‘डिलीट करा व्हाटसअ‍ॅप !’ : टेलिग्रामच्या संस्थापकाचे आवाहन

0

व्हाटसअ‍ॅप हे वैश्‍विक हेरगिरीतील मोठे टुल असून आपली गोपनीयता कायम राखायची असल्यास हे अ‍ॅप डिलीट करावे असे आवाहन टेलीग्रामचे संस्थापक पॉवेल दुरॉव्ह यांनी केले आहे.

अलीकडच्या काळात व्हाटसअ‍ॅपमधील सुरक्षाविषयक त्रुटी एकामागून एक समोर येत असल्याने जगभरातील युजर्समध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यातच आता टेलीग्राम मॅसेंजरचे संस्थापक पॉवेल दुरॉव्ह यांनी युजर्सनी गोपनीयता कायम राखायची असेल तर व्हाटसअ‍ॅप डिलीट करा असे थेट आवाहन केल्यामुळे या गोंधळात भर पडली आहे. दुराव्ह यांनी आपल्या टेलीग्राम चॅनलवरून प्रसिध्द केलेल्या एका पोस्टद्वारे हे आवाहन केले आहे. यात त्यांनी व्हाटसअ‍ॅपवर गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या मते व्हाटसअ‍ॅप हे वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षीत नाही. गेल्या आठवड्यातच एका एमपी४ फाईलच्या माध्यमातून व्हाटसअ‍ॅप हॅक करता येत असल्याचे उघडकीस आले होते. यावर व्हाटसअ‍ॅपने तातडीने उपायोजना केली असली तरी यातून यातील त्रुटी जाहीर झालेली असल्याकडे दुरॉव्ह यांनी लक्ष वेधले आहे. यासोबत त्यांनी व्हाटसअ‍ॅपची मालकी असणार्‍या फेसबुकवर गंभीर आरोपदेखील केला आहे. त्यांच्या मते फेसबुक हे दीर्घ काळापासून सरकारी टेहळणीत सहभागी राहिलेले आहे. यामुळे फेसबुक आणि व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सची गोपनीय माहिती या सरकारी गुप्तचर यंत्रणा पाहत असल्याची बाब उघड आहे. दस्तुरखुद्द व्हाटसअ‍ॅपचा सहसंस्थापक ब्रायन अ‍ॅक्शन यांनीही आधी आपण व्हाटसअ‍ॅपसोबत युजर्सची प्रायव्हसीदेखील फेसबुकला विकल्याचे कबूल केले असल्याचा दाखलादेखील त्यांनी दिला आहे.

दुरॉव्ह यांनी पुढे म्हटले आहे की, व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सची या मॅसेंजरमधीलच नव्हे तर त्यांच्या स्मार्टफोनमधील अन्य माहितीदेखील सुरक्षीत नाही. कारण या सर्व माहितीला चोरण्यात येत असून यामुळे संपूर्ण स्मार्टफोनच असुरक्षित होण्याचा धोका असतो. यापासूच बचाव करायचा असल्यास व्हाटसअ‍ॅप डिलीट करणे हाच एकमेव मार्ग असल्याचा दावादेखील पॉवेल दुराव्ह यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या या दाव्याने टेकविश्‍वात खळबळ उडाली असून याला व्हाटसअ‍ॅपकडून काय उत्तर दिले जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here